पुणे, दि. ११ (जिमाका वृत्तसेवा) :सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत घोडेगाव येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात १० ऑक्टोबर रोजी ‘खुले ग्रंथालय व पुस्तक परिचय’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रकल्प अधिकारी गणेश इवनाते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, ज्ञानात भर घालणे आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे हा उद्देश ठेवण्यात आला.
वाचनामुळे ज्ञानाची व्याप्ती वाढते, विचारांना दिशा मिळते आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध होते. या उद्देशाने आयोजित उपक्रमात विद्यार्थिनींना विविध विषयांवरील पुस्तकांची ओळख करून देण्यात आली. विद्यार्थिनींनी आपल्या आवडीची पुस्तके निवडून त्यांचे वाचन केले. तसेच पुस्तकांमधील महत्त्वाचे विचार, माहिती आणि आशय इतर विद्यार्थिनींसमोर मांडण्याची संधी त्यांना देण्यात आली.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना पुस्तकांशी संवाद साधण्याबरोबरच वाचनातून मिळालेले ज्ञान व्यक्त करण्याची संधी मिळाली. ग्रंथालय मंत्री यांच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी ग्रंथालयातील पुस्तके वाचनासाठी घेतली. यावेळी वसतिगृहाच्या गृहपाल रेणुका जाधव, कर्मचारीवर्ग आणि विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
विद्यार्थिनींमध्ये वाचनसंस्कृती रुजविणे, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता विकसित करणे आणि ज्ञानाधिष्ठित व्यक्तिमत्त्व घडविणे यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.


