पुणे, दि. १२ : पिंपरी-चिंचवड परिसरात प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांमधून अनधिकृतपणे मालवाहतूक होत असल्याचे आढळून आल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १८ वाहनांवर कारवाई करून एकूण २ लाख १५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
पोर्टर, ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या ऑनलाइन आधारित सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांमधून मालाची वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविण्यात आली. तपासणीदरम्यान मोटार वाहन कायदा व संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या संबंधित कंपन्यांना नोटिसा बजावून खुलासा मागविण्यात आला आहे.मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कलम ६६/१९२ नुसार परिवहन वाहनांना संबंधित परवाना घेणे आणि परवान्यात नमूद केलेल्या अटींचे पालन करणे आवश्यक आहे. परवान्याच्या अटींचे उल्लंघन करून वाहनांचा वापर केल्यास संबंधित वाहनमालक व चालकांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात येते.
प्रवासी वाहतुकीसाठी नोंदणी व परवाना घेतलेल्या वाहनांचा वापर केवळ परवान्यात नमूद केलेल्या उद्देशासाठीच करावा. प्रवासी वाहतुकीसाठी असलेल्या वाहनांचा अनधिकृतपणे मालवाहतुकीसाठी वापर करू नये. तसेच ऑनलाइन आधारित सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनीही संबंधित नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांच्याकडून करण्यात आले आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची यापुढेही नियमित तपासणी करण्यात येणार असून, अशा प्रकारचे उल्लंघन आढळल्यास संबंधित वाहनमालक व चालकांविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
०००


