Monday, October 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी -चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी पुर्नवसन व निर्मुलन विभागाच्या वतीने ‘शून्य कचरा कार्यालय’...

पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी पुर्नवसन व निर्मुलन विभागाच्या वतीने ‘शून्य कचरा कार्यालय’ उपक्रमाचा शुभारंभ

 

 

महापालिका वर्धापन दिनानिमित्त अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम व विक्रांत बगाडे यांच्या हस्ते झाले उद्घाटन; कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्पाचीही केली पाहणी

 

पिंपरी, दि. १२ ऑक्टोबर २०२६ : महापालिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागाने ‘शून्य कचरा कार्यालय’ या उपक्रमाची सुरुवात करून इतर कार्यालयांसमोर आदर्श निर्माण केला आहे. पिंपरी चिंचवडसारख्या झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरात कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे हे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक कार्यालयाने स्वतःच्या स्तरावर अशा पद्धतीने पुढाकार घेऊन कचऱ्याचे वर्गीकरण आणि योग्य विल्हेवाट लावण्यास सुरुवात केल्यास या आव्हानावर मात करण्यास मदत होईल, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी व्यक्त केले.

 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त चिंचवड येथील झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागाच्या मुख्य कार्यालयात ‘शून्य कचरा कार्यालय’ या उपक्रमाचा शुभारंभ अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि विक्रांत बगाडे यांच्या हस्ते करण्यात आला. शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासह कार्यालयीन स्तरावर कचऱ्याचे वर्गीकरण, योग्य विल्हेवाट आणि पर्यावरणपूरक सवयी रुजविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी चिंचवड येथील कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्पालाही भेट देऊन तेथील प्रशिक्षण उपक्रमांची पाहणी केली.

 

यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त दशरथ कांबळे, कार्यकारी अभियंता शेखर गुरव, आसरा फाऊंडेशन अध्यक्षा अर्चना मोरे, कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्प व्यवस्थापक अमृता बहुलेकर, आयपीसीए प्रतिनिधी दत्ता हेंद्रे, वैभव नसुरडे, आशिष कुंभलकर तसेच महापालिका कर्मचारी आणि लाईटहाऊस प्रकल्पातील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

 

 

 

यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी शून्य कचरा कार्यालय उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना महापालिकेच्या इतर कार्यालयांमध्येही ही संकल्पना राबविण्याची गरज व्यक्त केली. तसेच कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्पाच्या माध्यमातून युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा आढावा घेत, रोजगाराच्या बदलत्या संधींनुसार प्रशिक्षण अधिक परिणामकारक करण्याबाबत सूचना केल्या.

 

 

 

शून्य कचरा कार्यालयातून पर्यावरणपूरक सवयींना प्रोत्साहन – अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम

 

अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम म्हणाले, झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागाचे उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला ‘शून्य कचरा कार्यालय’ हा उपक्रम कौतुकास्पद आहे. पिंपरी चिंचवडसारख्या झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरात कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे हे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक कार्यालयाने स्वतःच्या स्तरावर पुढाकार घेऊन कचऱ्याचे वर्गीकरण आणि योग्य विल्हेवाट लावण्यास सुरुवात केल्यास या आव्हानावर मात करण्यास मदत होईल. या उपक्रमाचा आदर्श घेऊन महापालिकेच्या इतर कार्यालयांमध्येही अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

 

 

 

कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्पाविषयी बोलताना अतिरिक्त आयुक्त जंगम म्हणाले, युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरत आहे. सध्या पिंपरी चिंचवड शहरात दहा वेगवेगळ्या ठिकाणी लाईटहाऊस प्रकल्प कार्यान्वित असून, युवकांना त्यांच्या आवडीनुसार विविध अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेणाऱ्या महिलांचे प्रमाण अधिक असणे ही विशेष कौतुकाची बाब आहे. बदलत्या काळानुसार रोजगाराच्या संधींमध्येही बदल होत आहेत. त्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमांपुरते मर्यादित न राहता ग्राफिक डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, व्हिडिओ एडिटिंग आणि मोशन ग्राफिक्स यांसारख्या आधुनिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जात आहे, ही सकारात्मक बाब आहे. यासोबतच युवकांना विविध परदेशी भाषांचे ज्ञान देणेही गरजेचे आहे. परदेशातील रोजगाराच्या संधींचा अभ्यास करून त्यानुसार प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्यास युवकांना जागतिक स्तरावर करिअरच्या अधिक संधी मिळू शकतील, असेही त्यांनी नमूद केले.

 

 

 

सर्व महापालिका कार्यालयांत शून्य कचरा संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्न करणार – अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे

 

अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे म्हणाले, झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागाने महापालिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘शून्य कचरा कार्यालय’ उपक्रम सुरू केला, ही अभिनंदनीय बाब आहे. मोठी लोकसंख्या असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात कचरा व्यवस्थापनाची समस्या सोडविण्यासाठी अशा संकल्पना उपयुक्त ठरू शकतात. भविष्यात महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये ही संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्याची सुरुवात मुख्य प्रशासकीय इमारतीपासून करण्यात येईल. अशा उपक्रमांमुळे कचरा विलगीकरण, पुनर्वापर आणि टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याबाबत जनजागृती होण्यास मदत होईल.भविष्यात महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये ही संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्याची सुरुवात मुख्य प्रशासकीय इमारतीपासून करण्यात येईल. कार्यालयीन स्तरावर कचऱ्याचे योग्य विलगीकरण, पुनर्वापर आणि टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याच्या उपक्रमांना प्रोत्साहन दिल्यास कर्मचाऱ्यांसह नागरिकांमध्येही कचरा व्यवस्थापनाविषयी जागरूकता वाढेल, असे त्यांनी सांगितले.

 

 

 

कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्पाच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक युवकांना विविध अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण मिळाले असून, अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढे प्रत्यक्ष रोजगार मिळतो की नाही, याचाही नियमित आढावा घेणे आवश्यक आहे. दर तीन महिन्यांनी विद्यार्थ्यांच्या रोजगारस्थितीचा आढावा घेऊन सर्वेक्षणाच्या आधारे त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि त्यांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे बगाडे यांनी नमूद केले. परदेशातील रोजगाराच्या संधींचा विचार करून अभ्यासक्रमांची आखणी करणेही महत्त्वाचे आहे. नर्सिंग आणि हॉटेल व्यवसायासारख्या क्षेत्रांतील मनुष्यबळाची मागणी लक्षात घेऊन संबंधित कौशल्यांचे प्रशिक्षण दिल्यास युवकांसाठी करिअरच्या नव्या वाटा खुल्या होऊ शकतात. अशा प्रकारचे प्रशिक्षण युवकांच्या व्यावसायिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

 

 

उप आयुक्त अण्णा बोदडे म्हणाले, कार्यालयात कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन ‘शून्य कचरा कार्यालय’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कचरा व्यवस्थापनाची सुरुवात स्वतःपासून करून दैनंदिन कामकाजात कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, पुनर्वापर आणि विलगीकरणाची सवय अंगीकारावी, अशा सूचना सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. या संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले, ही समाधानाची बाब आहे. प्रत्येकाने आपल्या स्तरावर पर्यावरणपूरक सवयींचा अवलंब केल्यास कार्यालयातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे शक्य होईल. या उपक्रमाच्या माध्यमातून स्वच्छ, सुंदर व हरित पिंपरी चिंचवडच्या उद्दिष्टपूर्तीस हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे.

 

 

 

चौकट : ‘शून्य कचरा कार्यालय’ म्हणजे काय?

 

कार्यालयात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया करून अंतिम विल्हेवाटीसाठी पाठवल्या जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमीत कमी ठेवणे, हा ‘शून्य कचरा कार्यालय’ या संकल्पनेचा मुख्य उद्देश आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागाच्या मुख्य कार्यालयात या उपक्रमांतर्गत कचरा वर्गीकरणासाठी स्वतंत्र डब्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये काच संकलन, रद्दी पेपर संकलन, धातू संकलन, स्वच्छ पॉलिथिन संकलन, स्वच्छ प्लास्टिक संकलन आणि ई-कचरा संकलनासाठी स्वतंत्र डबे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना संबंधित कचरा योग्य त्या डब्यात टाकणे शक्य होणार आहे. यासोबतच, ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खतनिर्मिती करण्यासाठी ऑरगॅनिक कंपोस्ट ड्रमची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे कार्यालयात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, पुनर्वापरयोग्य वस्तूंचे स्वतंत्र संकलन आणि जैवविघटनशील कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यास मदत होणार आहे. तसेच, कर्मचाऱ्यांमध्ये कचरा विलगीकरणाच्या सवयी रुजवून पर्यावरणपूरक कार्यालयीन कार्यपद्धती विकसित करणे आणि स्वच्छ, सुंदर व हरित पिंपरी चिंचवडच्या उद्दिष्टाला चालना देणे हा या उपक्रमाचा हेतू आहे.

 

 

 

कोट

 

पिंपरी चिंचवड शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे ही प्रशासनासह प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘शून्य कचरा कार्यालय’ उपक्रमाच्या माध्यमातून कार्यालयीन स्तरावर कचऱ्याचे वर्गीकरण, योग्य विल्हेवाट आणि ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मितीला प्रोत्साहन मिळेल. या उपक्रमाचा विस्तार महापालिकेच्या इतर कार्यालयांमध्येही करून स्वच्छ, सुंदर आणि हरित पिंपरी-चिंचवडच्या दिशेने ठोस पावले उचलण्यात येतील. तसेच, कौशल्यम लाईटहाऊससारख्या उपक्रमांच्या माध्यमातून युवकांना बदलत्या रोजगाराच्या संधींनुसार कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्यावरही महापालिकेचा भर राहील.

 

 

— डॉ.

विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments