Thursday, October 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुंबईत प्रथिनांच्या सेवनाचे आव्हान; ६९% नागरिकांचे सेवन अपुरे, अधिक किंमत ठरतेय प्रमुख...

मुंबईत प्रथिनांच्या सेवनाचे आव्हान; ६९% नागरिकांचे सेवन अपुरे, अधिक किंमत ठरतेय प्रमुख अडथळा* _पेप्सिको इंडिया आणि युरोमॉनिटरच्या अभ्यासातून निष्कर्ष_

 

 

• शहरी भारतातील ७०% प्रतिसादकर्ते ४१ ग्रॅमपेक्षा कमी प्रथिनांचे सेवन करतात, तर ६१% प्रतिसादकर्त्यांचे दैनंदिन फायबरचे सेवन शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा कमी

• प्रथिने आणि फायबरच्या पुरेशा सेवनात अधिक किंमत आणि सोयीस्कर पर्यायांचा अभाव हे प्रमुख अडथळे

• सीआयआयच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमात अभ्यासाचे निष्कर्ष सादर; पोषण, उद्योग आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग

 

 

मुंबई, १५ ऑक्टोबर २०२६: मुंबईकरांमध्ये पोषणाबाबतची जागरूकता वाढत असली, तरी प्रत्यक्ष सेवन आणि पोषक अन्नाची सहज उपलब्धता ही अजूनही मोठी आव्हाने आहेत. पेप्सिको इंडियाने युरोमॉनिटर इंटरनॅशनल आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च (आयआयएमआर) यांच्या सहकार्याने केलेल्या नव्या अभ्यासानुसार, मुंबईतील ६९% प्रतिसादकर्ते ४१ ग्रॅमपेक्षा कमी प्रथिनांचे सेवन करतात, तर पुरेशा प्रमाणात प्रथिने घेण्यात अधिक किंमत हा अडथळा असल्याचे ६२% जणांनी सांगितले. फायबरच्या बाबतीतही उपलब्धतेचे आव्हान दिसून आले असून, ७१% प्रतिसादकर्त्यांच्या मते सोयीस्कर आणि विश्वासार्ह फायबरयुक्त खाद्यपदार्थांचे पुरेसे पर्याय उपलब्ध नाहीत.

 

 

‘द स्टेट ऑफ प्रोटीन अँड फायबर इन अर्बन इंडिया’ या शीर्षकाखाली करण्यात आलेल्या या अभ्यासात दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता आणि कोची या पाच शहरांमधील १८ ते ५० वर्षे वयोगटातील १,२५० प्रतिसादकर्त्यांचा समावेश करण्यात आला. मुंबईतील निष्कर्षांवरून पोषणाचे आव्हान केवळ जागरूकतेपुरते मर्यादित नसल्याचे दिसते. मुंबईतील ७०% प्रतिसादकर्त्यांनी आपल्या प्रथिनांच्या गरजेबाबत जागरूक असल्याचे सांगितले, मात्र ५८% जणांकडे याबाबत अचूक माहिती नसल्याचे आढळून आले. त्याचबरोबर परवडणारी किंमत आणि सोयीस्कर पर्यायांची उपलब्धता यांचाही दैनंदिन आहारातील निवडींवर परिणाम होत असल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

 

 

अभ्यासातील प्रमुख निष्कर्ष

 

• जागरूकता म्हणजे अचूक माहिती असे नाही: दैनंदिन प्रथिनांच्या गरजेबाबत जागरूक असल्याचे ७४% ग्राहकांनी सांगितले. मात्र ५६% ग्राहकांकडे याबाबत अचूक माहिती नाही. यामध्ये आपल्या दैनंदिन गरजेबाबत माहिती नसलेले, त्याबद्दल साशंक असलेले किंवा आवश्यक प्रमाण अचूकपणे सांगू न शकणाऱ्यांचा समावेश आहे.

 

• आहारात प्रथिनांची कमतरता: सर्वेक्षणातील ७०% प्रतिसादकर्ते दररोज ४१ ग्रॅमपेक्षा कमी प्रथिनांचे सेवन करतात, जे शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा कमी आहे. सर्वेक्षण करण्यात आलेल्या पाचही शहरांमध्ये प्रथिनांच्या सेवनातील ही तफावत दिसून आली.

 

• फायबरबाबत माहितीची दरी आणखी मोठी: ५९% प्रतिसादकर्त्यांनी आपल्या दैनंदिन फायबरच्या गरजेबाबत माहिती असल्याचे सांगितले. मात्र ८९% जणांकडे यासंदर्भात अचूक माहिती नसल्याचे दिसून आले. केवळ ११% प्रतिसादकर्ते शिफारस केलेले प्रमाण अचूकपणे ओळखू शकले.

 

• शहरे आणि पिढ्यांमध्येही फायबरचे सेवन अपुरे: ६१% प्रतिसादकर्त्यांचे फायबरचे सेवन शिफारस केलेल्या दैनंदिन प्रमाणापेक्षा कमी आहे. जनरेशन एक्समध्ये हे प्रमाण ६५% असून, जनरेशन झेड आणि मिलेनियल्समध्ये ते ५८% आहे.

 

• दैनंदिन आहारात सहजपणे प्रथिने समाविष्ट करण्याला पसंती: विविध वयोगटांतील सुमारे १० पैकी ९ ग्राहकांना आपल्या नियमित आहारात प्रथिनांचा समावेश करणे अधिक सोपे आणि सहज व्हावे असे वाटते. तर ८९% ग्राहकांना परिचित आणि दैनंदिन वापरातील खाद्यपदार्थांच्या स्वरूपात प्रथिने उपलब्ध व्हावीत अशी अपेक्षा आहे.

 

• किंमत आणि सोयीस्कर पर्यायांचा अभाव: पुरेशा प्रमाणात प्रथिनांचे सेवन करण्यात ६०% ग्राहकांनी अधिक किंमत, तर ५७% ग्राहकांनी सोयीस्कर आणि विश्वासार्ह प्रथिनयुक्त खाद्यपदार्थांच्या पर्यायांचा अभाव ही प्रमुख कारणे असल्याचे नमूद केले.

 

• फायबरयुक्त पर्यायांची उपलब्धता हे मोठे आव्हान: ६९% ग्राहकांच्या मते सोयीस्कर आणि विश्वासार्ह फायबरयुक्त खाद्यपदार्थांचे पुरेसे पर्याय उपलब्ध नाहीत. कोचीमध्ये हे प्रमाण ७४%, कोलकात्यात ७२%, तर मुंबईत ७१% आहे.

 

 

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या (सीआयआय) सहकार्याने आयोजित कार्यक्रमात या अभ्यासाचे निष्कर्ष सादर करण्यात आले. पोषण, सार्वजनिक आरोग्य आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. अभ्यासातील निष्कर्षांच्या पार्श्वभूमीवर पोषणविषयक जागरूकता आणि प्रत्यक्ष सेवन यांतील दरी, तसेच उत्तम पोषण अधिक सहज उपलब्ध, परिचित आणि दैनंदिन आहाराचा सोपा भाग बनविण्याची गरज यावर चर्चा करण्यात आली.

 

अभ्यासाच्या प्रकाशनाबाबत पेप्सिको इंडियाच्या संचालक, आर अँड डी लाइफसायन्स आणि इंडिया आर अँड डी साइट लीड डॉ. अंकिता मारवाहा म्हणाल्या, “ग्राहक आपल्या आरोग्याचा आणि स्वास्थ्याचा विचार करताना पोषणाला अधिक महत्त्व देत असले, तरी केवळ जागरूकता पुरेशी नाही. पोषणाबाबतची विश्वासार्ह माहिती प्रत्यक्ष दैनंदिन आहारातील योग्य निवडींमध्ये रूपांतरित करण्यासाठी लोकांना मदत करणे महत्त्वाचे आहे. पेप्सिको इंडियामध्ये ग्राहकांच्या जवळ राहणे आणि त्यांच्या गरजा व वर्तनात होत असलेले बदल समजून घेणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. पोषणविषयक आमची समज अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही संशोधन आणि शैक्षणिक क्षेत्राशी सातत्याने संवाद साधत आहोत. त्याचबरोबर ग्राहकांना अधिक माहितीपूर्ण निर्णय घेता यावेत यासाठी अधिक चांगले पर्याय कसे उपलब्ध करून देता येतील, याचाही आम्ही शोध घेत आहोत. हा अभ्यास त्या प्रवासाचाच एक भाग आहे. प्रथिने आणि फायबरबाबत जागरूकता, समज आणि प्रत्यक्ष कृती यांतील महत्त्वाची दरी तो अधोरेखित करतो. तसेच ग्राहकांच्या दैनंदिन खाद्यपदार्थांच्या निवडींवर प्रभाव टाकणाऱ्या वास्तव परिस्थितीबाबत आम्हाला अधिक सखोल माहिती देतो.”

 

 

जागतिक पातळीवरील १४५ वर्षांहून अधिक वारसा आणि २००६ पासून भारतातील उपस्थिती असलेला क्वेकर हा पेप्सिको फूड्सच्या उत्पादन पोर्टफोलिओचा महत्त्वाचा भाग आहे. जगातील क्रमांक १ चा ओट्स ब्रँड¹ असलेला क्वेकर ओट्स आणि पोषण क्षेत्रातील आपल्या अनुभवाच्या आधारे पोषणाच्या क्षेत्रात अधिक व्यापक भूमिका बजावत असून, प्रथिने आणि फायबरवर अधिक भर देत आहे.

 

अभ्यासातून जनरेशन झेडमध्ये प्रथिनांचा दैनंदिन आहारात सहज समावेश करण्याची तीव्र इच्छा असल्याचेही समोर आले. ८९% जनरेशन झेड ग्राहकांना आहारात प्रथिने समाविष्ट करणे अधिक सोपे आणि सहज व्हावे असे वाटते, तर ९०% जणांना अधिक परिचित आणि दैनंदिन खाद्यपदार्थांच्या स्वरूपात प्रथिने उपलब्ध व्हावीत अशी अपेक्षा आहे.

 

अभ्यासातील निष्कर्षांवर प्रतिक्रिया देताना युरोमॉनिटर इंटरनॅशनलचे वरिष्ठ सल्लागार दिलीप राधाकृष्ण म्हणाले, “प्रथिने आणि फायबरबाबत ग्राहकांची रुची आणि त्यांच्या दैनंदिन पोषणविषयक गरजांची समज यामध्ये असलेली दरी या अभ्यासातून अधोरेखित होते. अनेक प्रतिसादकर्त्यांनी आपल्या आहारातून हे पोषक घटक मिळविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. मात्र त्यांच्या दैनंदिन गरजांबाबत असल्याचे सांगितले जाणारे ज्ञान नेहमीच अचूक माहितीमध्ये रूपांतरित होत नाही. फायबरच्या बाबतीत ही तफावत विशेषत्वाने दिसून येते. पाचही शहरे आणि विविध वयोगटांमध्ये ही माहितीची दरी दिसते. त्यामुळे पोषणविषयक संवाद केवळ जागरूकता निर्माण करण्यापुरता मर्यादित न ठेवता, ग्राहकांना नेमके किती पोषण आवश्यक आहे आणि दैनंदिन खाद्यपदार्थांच्या निवडींद्वारे ती गरज कशी पूर्ण करता येईल हे समजावून सांगण्याची संधी आहे.”

 

अभ्यासातील निष्कर्षांनुसार, पोषणविषयक माहितीचे दैनंदिन आहारातील निवडींमध्ये रूपांतर करणे अधिक सोपे करण्याची व्यापक गरज आहे. विविध पिढ्यांतील ग्राहकांनी आपल्या नियमित आहारात सहज सामावून घेता येतील अशा प्रथिनयुक्त पर्यायांना पसंती दर्शविली. त्याचबरोबर सोयीस्कर आणि विश्वासार्ह पर्यायांचा अभाव हा फायबरच्या सेवनातील महत्त्वाचा अडथळा असल्याचेही समोर आले.

 

या अभ्यासाच्या माध्यमातून ग्राहकांच्या बदलत्या गरजांबाबत अधिक सखोल आकलन विकसित करणे आणि उत्तम पोषण दैनंदिन जीवनशैलीसाठी अधिक व्यावहारिक, सहज उपलब्ध आणि उपयुक्त कसे करता येईल, यावरील व्यापक चर्चेत योगदान देण्याचा पेप्सिको इंडियाचा उद्देश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments