पुणे, दि. १५ ऑक्टोबर :
“आजच्या आधुनिक काळात मनोरंजनाची कितीही डिजिटल साधने उपलब्ध झाली, तरी मानवी मन हे नेहमी जिवंत कलांच्या मागेच धावेल. कथाकथनाने लेखक ते सादरकर्ता आणि पुस्तक ते वाचक असा एक समृद्ध प्रवास घडवून आणला आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी केले.
संस्कार भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने आयोजित ‘कथाकथी २६’ या कथाकथन स्पर्धेची अंतिम फेरी आणि बक्षीस वितरण समारंभ गुरुवारी (१५ ऑक्टोबर) पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. मराठी साहित्यात कथाकथन हा प्रकार लोकप्रिय करणाऱ्या कै. द. मा. मिरासदार, शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर या दिग्गज त्रयीच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी द. मा. मिरासदार यांचे बंधू हरिभाऊ मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर यांच्या कन्या ज्ञानदा नाईक आणि संस्कार भारतीचे प्रांत अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. नटराज पूजन व संस्कार भारतीच्या ध्येयगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या वेळी बोलताना हरिभाऊ मिरासदार म्हणाले, “कथाकथनात हास्य रसापासून करुण रसापर्यंत मानवी जीवनाचे विविध रंग दाखवण्याची अनोखी ताकद आहे.” तर ज्ञानदा नाईक यांनी, “एक चांगला वाचक जसा चांगला लेखक होऊ शकतो, तसेच एक चांगला कथा सादरकर्ता हा उत्तम अभिनेता बनू शकतो,” असे मत व्यक्त केले. परीक्षक नरेंद्र आमले यांनी पुढील वर्षी युवा वर्गाच्या सहभागाने ही स्पर्धा अधिक व्यापक स्वरूपात घेण्याचा संकल्प व्यक्त केला. प्रास्ताविक प्रांत महामंत्री प्रशांत कुलकर्णी यांनी केले. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी नमूद केले. मान्यवरांचा परिचय प्रांत प्रचार मंडळ सदस्या मेघना कुलकर्णी यांनी, तर परीक्षकांचा परिचय मंचीय कला विभाग संयोजक व उपक्रम समन्वयक रश्मी देव यांनी करून दिला. मान्यवर आणि परीक्षकांचा सन्मान शाहीर हेमंतराजे मावळे यांच्या हस्ते करण्यात आला.
– स्पर्धेचे विजेते व पारितोषिक विजेते:
स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या अंजोर खोपडे, साक्षी उंडे आणि अनिकेत देऊळगांवकर या तीन स्पर्धकांना अनुक्रमे शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर व द. मा. मिरासदार स्मृती करंडक आणि प्रत्येकी ₹१०,०००/- रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच अमितकुमार शेलार, नीलिमा फाटक, उर्वी मराठे, उमा कानिटकर आणि कीर्ती मराठे यांना मान्यवरांच्या हस्ते ‘सादरीकरण स्मृतीचिन्ह’ देऊन सन्मानित करण्यात आले.


