पुणे : विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पोषक वातावरण मिळण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध होणेही महत्त्वाचे आहे. याच जाणिवेतून विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी आणि त्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आर आर काबिल आणि निरंजन सेवाभावी संस्थेच्या पुढाकारातून पुण्यातील दोन शाळांमध्ये जलकुंभ उभारण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन सोमवार पेठेतील आबासाहेब अत्रे प्रशालेत झाले.
आर आर ग्लोबलच्या संचालिका कीर्ती काबरा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सेफ पॅक इंडस्ट्रीजच्या संचालिका अंजली तापडिया प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी नीलम परतानी, अभय करवा, भारत वेदपाठक, संजीव महाजन, सतीश बजाज, प्रसाद बजाज, गणेश सारडा, श्रीराम परतानी, नवल भुतडा आणि वेन्सी डाबरे उपस्थित होते.
आर आर काबिलच्या सीएसआर उपक्रमांतर्गत नगर जिल्ह्यातील दोन, बीड जिल्ह्यातील दोन आणि पुण्यातील चार अशा एकूण आठ शाळांमध्ये जलकुंभ उभारण्यात आले आहेत. या उपक्रमासाठी अंदाजे ४० लाख रुपये खर्च करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
कीर्ती काबरा म्हणाल्या, सोशल मीडियाच्या काळात विद्यार्थ्यांनी लक्ष विचलित होऊ न देता शिक्षणाच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायला हवे. देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. लोकांच्या आयुष्यात प्रकाश आणणाऱ्या रोशनी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकासाचे उपक्रम राबविण्यात येतात तसेच शिष्यवृत्तीही दिली जाते.
अंजली तापडिया म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी स्वच्छ पिण्याचे पाणी ही अत्यावश्यक मूलभूत सुविधा आहे. शाळांमध्ये जलकुंभ उभारल्यामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी उपलब्ध होणार असून, त्यांच्या आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत होईल. आर आर काबिलच्या सीएसआर उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेला हा स्तुत्य उपक्रम असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे.
संजीव महाजन म्हणाले, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे हे शताब्दी वर्ष असून, या निमित्ताने आर आर काबिल च्या माध्यमातून योग्य ठिकाणी मदतीचा हात देण्यात आला आहे. सर्वांनी एकत्रितपणे मदत केल्यास समाजातील तळागाळातील मुलांना चांगले शिक्षण आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देता येतील.


