Friday, October 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीची ताकद* ...

स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीची ताकद* **महायुतीच्या समन्वय बैठकीत निर्धार; पाचही जिल्ह्यांत एकत्रित प्रचारावर भर**

 

 

पुणे, ता. १६ : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समन्वयाने प्रचार करण्याचा निर्धार शुक्रवारी झालेल्या महायुतीच्या बैठकीत व्यक्त केला.

 

राष्ट्रवादी काँग्रेस भवनात झालेल्या या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, महापौर मंजुषा नागपुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह दोन्ही पक्षांचे आमदार, माजी आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘या निवडणुकीसाठी कमी कालावधी मिळाला असला, तरी महायुतीच्या सर्व घटकांनी एकदिलाने काम करणे आवश्यक आहे. डॉ. स्मिता जाधव या उच्चशिक्षित असून, त्यांना शैक्षणिक क्षेत्राचा व्यापक अनुभव आहे. राज्यभरात ४५० हून अधिक शाळा असलेल्या शिक्षण संस्थेचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. कौस्तुभ गावडे यांच्या रूपाने शिक्षकांचे प्रश्न जाणणारा तरुण आणि अभ्यासू उमेदवार महायुतीने दिला आहे. निवडणुकीच्या काळातील मानपान आणि नाराजी बाजूला ठेवून दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी एकत्र यावे.’’

 

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांत राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपच्या कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करतील. महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कुठेही कमी पडणार नाही.’’

 

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या एकजुटीसाठी घेतलेली भूमिका आणि त्यांना दिलेला शब्द लक्षात घेऊन दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न केले जातील. दोन्ही उमेदवारांचा विजय हीच अजित पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल,असेही भरणे यांनी सांगितले.

 

महायुतीतील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी दर तीन ते चार महिन्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या बैठका घ्याव्यात. तसेच तालुका स्तरावर संयुक्त बैठका घेऊन कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करावी, अशी सूचना भरणे यांनी केली. या प्रस्तावाला शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी अनुमोदन दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दोन्ही उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

बैठकीला आमदार राहुल कुल, भीमराव तापकीर, महेश लांडगे, चेतन तुपे, शंकर मांडेकर, सुनील शेळके, माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील, रमेश थोरात, अतुल बेनके, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, राजेंद्र कोरेकर, संभाजी होळकर, योगेश बहल, दिगंबर दुर्गाडे, सुनील चांदेरे, वीरधवल जगदाळे, राजेश पांडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

चौकट :

 

तालुकास्तरावर संयुक्त प्रचार यंत्रणा

 

पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त बैठका घेऊन प्रचाराचे नियोजन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. स्थानिक पातळीवरील मतभेद दूर करून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे आणि पदवीधर व शिक्षक मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments