Thursday, October 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्त्री-पुरुष समानतेचे सूत्र आजच्या पिढीने मानले* ज्येष्ठ लेखिका मृणालिनी चितळे ;...

स्त्री-पुरुष समानतेचे सूत्र आजच्या पिढीने मानले* ज्येष्ठ लेखिका मृणालिनी चितळे ; ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा देशपांडे यांना व्यावसायिक सर्वोत्तम गुणवत्ता पुरस्कार प्रदान 

 

 

पुणे : आजच्या पिढीतील पुरुष पालकत्वाची जबाबदारी स्वीकारत त्याचा आनंद घेत आहेत, हे चांगले चित्र आहे. पूर्वीच्या समाजसुधारकांनी पाहिलेले स्वप्न आज पूर्णत्वास जाताना दिसत आहे. आज आपण वेगळ्या दृष्टीने स्त्री – पुरुष समानतेकडे बघत आहोत. समानतेचे हे सूत्र आजच्या पिढीने मानले असल्याची भावना ज्येष्ठ लेखिका मृणालिनी चितळे यांनी व्यक्त केली.

 

रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊन च्या वतीने व्यावसायिक सर्वोत्तम गुणवत्ता पुरस्कार प्रदान कार्यक्रम एरंडवणे येथील सेवासदन शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा देशपांडे यांना व्यावसायिक सर्वोत्तम गुणवत्ता पुरस्काराने गौरविण्यात आले. व्यासपीठावर क्लबच्या अध्यक्ष डॉ. शुभदा जठार, सचिव समीर मोहिरे, संचालक सुरज पाषाणकर आदी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

 

मृणालिनी चितळे म्हणाल्या, एकपात्री प्रयोग करण्यामध्ये अनेक आव्हाने असतात. मात्र, सुषमा देशपांडे यांनी ती आव्हाने लिलया पेलली. सावित्रीबाईंची भूमिका करताना त्याप्रकारची देहबोली, बाझ यासाठी संशोधन व अभ्यास देखील केला. स्त्री म्हणून प्रत्येकीला कर्तृत्व सिद्ध करायला लागते. हे फक्त भारतात नाही, तर अमेरिकेसारख्या देशातही स्त्री समोर अनेक आव्हाने आहेत. कोठेही आत्मसन्मान मागून मिळत नाही. तर तो कमवावा लागतो, असेही त्यांनी सांगितले.

 

सुषमा देशपांडे म्हणाल्या, मला लिखाणाचे वेड होते. पत्रकारिता करताना वाटले नव्हते की मी अभिनय करावा. मात्र, लिखित शब्दाला खूप मर्यादा असतात. ते मोठ्या प्रमाणात वाचले जातात असे नाही. त्यामुळे वेगळ्या माध्यमातून विचार पोहोचविण्याच्या दृष्टीने सावित्रीबाईंवरील प्रयोग करण्याचे ठरविले आणि नाट्य पत्रकारिता मांडायला सुरुवात केली. समाजात स्त्री संतांचा अभ्यास तेवढ्या प्रमाणात झालेला दिसत नाही. त्यामुळे मी त्यांचे विचार मांडण्याचा प्रयत्न केला.

 

डॉ. शुभदा जठार म्हणाल्या, स्त्री शक्तीची ज्योत जागृत ठेवण्यासाठी अनेक महिलांचे योगदान आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान यानिमित्ताने करण्यात आला. रोटरी क्लब आजमितीस २०० देशात ३५ हजार क्लबच्या माध्यमातून कार्यरत आहे. जागतिक शांतता, पर्यावरण, आरोग्य यांसह विविध सामाजिक विषयावर कार्य सुरु आहे. रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊनला ५६ वर्षे झाली असून नवनवीन उपक्रम क्लब राबवित असल्याचे त्यांनी सांगितले. दिविजा एरंडे यांनी सूत्रसंचालन केले. शोभा सोमाणी यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments