पुणे : वेदद्रीष्टी फाऊंडेशन व ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र, पुणे या संस्थेतर्फे षष्ठम पदवी प्रदान सोहळा व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन रविवार, दिनांक १ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. पद्मावती येथील विणकर सभागृह येथे सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळात हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्योतिष वास्तू विशारद वेदमूर्ती उमेश कुलकर्णी गुरुजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला संस्थेच्या संपर्कप्रमुख अॅड. श्रुती योगेश पिसे उपस्थित होत्या.
सोहळ्यात महाराष्ट्रासह देश-विदेशातील विविध वयोगटांतील, संस्थेच्या विविध अभ्यासक्रमांतून शिक्षण पूर्ण केलेल्या सुमारे १५० विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे व पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. सकाळी १० वाजल्यापासून मुख्य पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. यामध्ये वास्तुविशारद, अंकविशारद, वास्तुभूषण, भवनशास्त्र प्रवीण, स्वप्नशास्त्र प्रवीण, पंचांग प्राज्ञ आणि लोलक विशारद या अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या प्रसंगी वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अध्यात्म व भारतीय ज्ञानपरंपरेतील मान्यवर, तज्ञ आणि अभ्यासक उपस्थित राहणार आहेत.
सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणा-या मान्यवरांना प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. शास्त्राधिष्ठित शिक्षणाचा प्रसार आणि गुणवंत विद्यार्थी घडविण्याच्या कार्यासाठी वेदमूर्ती मंदार मधुकर जोशी यांना रत्नमाला पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी हा पुरस्कार डॉ. दिलीप नेमीचंद नहार आणि पंचांगकर्ते मोहन दाते यांना प्रदान करण्यात आले होते. वैदिक वाङ्मयातील अध्ययन, चिंतन व लेखनात्मक योगदानाबद्दल प्रतिभा प्रभाकर भालेराव यांना शारदा पुरस्कार २०२६ देऊन गौरविण्यात येणार आहे. यापूर्वी वास्तुगुरू नरेंद्र सहस्रबुद्धे, विद्यावाचस्पती डॉ. स्वानंद पुंड आणि गुरुश्री प्रिया मालवणकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
तसेच साहित्यिक लेखन व सृजनशील साहित्यसेवेतील योगदानाबद्दल वंदना विजय धर्माधिकारी यांना अक्षरलक्ष्मी पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी अंजली पोतदार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. पुरस्कारार्थींना सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, पारंपरिक पगडी, श्रीफळ, सन्मानमाला व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात येणार आहे.
सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली प्रत्यक्ष वास्तुभेट व प्रात्यक्षिक मार्गदर्शन होय. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वास्तूस्थळी नेऊन वास्तुरचना, दिशांचे निरीक्षण, वास्तुपरीक्षण आणि अभ्यासक्रमातील संकल्पनांचा व्यावहारिक उपयोग याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष क्षेत्रातील अनुभव मिळून त्यांचे व्यावसायिक कौशल्य अधिक विकसित होण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. मुख्य समारंभानंतर सायंकाळी ४.१५ ते ६ या वेळेत प्रात्यक्षिक वास्तुभेट आयोजित करण्यात आली आहे.
संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र आणि भारतीय ज्ञानपरंपरेशी संबंधित विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जात असून, संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्याबरोबरच भारतीय ज्ञानपरंपरा, संशोधन, साहित्य आणि शास्त्राधिष्ठित शिक्षणाला प्रोत्साहन देणे, हा या वार्षिक सोहळ्याचा प्रमुख उद्देश असल्याचे वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांनी सांगितले.


