नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर २०२६: किआ इंडियाने ऑक्टोबर २०२६ मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री नोंदवत ३३,४६२ युनिट्सची घाऊक विक्री केली. ऑक्टोबर २०२५ मधील २९,५५६ युनिट्सच्या तुलनेत कंपनीने १३.२२ टक्के वार्षिक वाढ नोंदवली आहे. विशेष म्हणजे, सप्टेंबर २०२६ मध्ये नोंदवलेला ३२,०१७ युनिट्सचा विक्रीचा विक्रमही कंपनीने मागे टाकला. सलग दुसऱ्या महिन्यात किआने स्वतःचाच विक्रम मोडला आहे.
जानेवारी ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कंपनीची एकूण घाऊक विक्री २,८६,४७० युनिट्सवर पोहोचली असून, मागील वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत २१.३१ टक्के वाढ झाली आहे. यासह कंपनीने २०२५ या संपूर्ण वर्षातील २,८०,२८६ युनिट्सच्या विक्रीचा आकडाही ओलांडला आहे.
सणासुदीच्या काळातील सकारात्मक वातावरण, प्रस्थापित मॉडेल्सना मिळणारी ग्राहकांची पसंती आणि नवीन उत्पादनांच्या सादरीकरणामुळे ऑक्टोबरमधील विक्रीला चालना मिळाली. किआ सेल्टॉस आणि सोनेट या मॉडेल्सनी विक्रीतील महत्त्वपूर्ण योगदान कायम ठेवले. सेल्टॉसची ऑक्टोबरमध्ये १३,००० हून अधिक युनिट्सची विक्री झाली. जानेवारी २०२६ मध्ये लॉन्च झाल्यापासून या मॉडेलची सरासरी मासिक विक्री १०,००० युनिट्सपेक्षा अधिक राहिली आहे. कॅरेन्स आणि कॅरेन्स क्लॅव्हिस या मॉडेल्समुळे कंपनीच्या कौटुंबिक वाहनांच्या श्रेणीलाही बळ मिळाले आहे, असे मत कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष (विक्री आणि विपणन) अतुल सूद यांनी व्यक्त केले
.


