पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य रक्षणासाठी मराठ्यांनी गाजविलेल्या पराक्रमाच्या अनेक शौर्यगाथा इतिहासात नोंदल्या आहेत. त्यापैकी सन १६७२ मध्ये साल्हेरच्या लढाईत मराठ्यांनी मोगलांचा केलेला पराभव ही विशेष महत्त्वाची घटना आहे. या ऐतिहासिक रणसंग्रामाची शौर्यगाथा आता भव्य दुर्ग प्रतिकृती, मावळ्यांच्या मूर्ती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुण्यात अनुभवता येणार आहे.
इतिहास प्रेमी मंडळ आणि लोकमान्य कल्चरल फाउंडेशन यांच्या वतीने ‘साल्हेरचा रणसंग्राम’ या भव्य दुर्ग प्रतिकृती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेत होणार आहे. निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे, कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पुनीत बालन आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.
साल्हेरच्या लढाईत सरनौबत प्रतापराव गुजर आणि पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांनी मराठा सैन्याचे नेतृत्व करत मोगल सैन्याचा पराभव केला. या लढाईत मराठ्यांनी दाखविलेली युद्धनीती, गनिमी काव्याचा प्रभावी वापर आणि शौर्य यांचे दर्शन प्रदर्शनातून घडणार आहे. तब्बल ३० फूट लांबीच्या भव्य प्रतिकृतीसह शेकडो मावळ्यांच्या मूर्ती हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि अभ्यासपूर्ण निवेदनाच्या माध्यमातून साल्हेरच्या रणसंग्रामाचा इतिहास उलगडला जाणार आहे.
महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीच्या दुर्गांपैकी एक असलेल्या साल्हेर किल्ल्याचा इतिहास आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व या प्रदर्शनातून अधोरेखित होणार आहे. सुमारे अर्ध्या तासाच्या साऊंड अँड लाईट शोमधून प्रेक्षकांना त्या काळातील युद्धाचा चित्तथरारक अनुभव घेता येणार आहे. हे प्रदर्शन ७ ते १५ नोव्हेंबरदरम्यान सकाळी १० ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.


