पंच परिवर्तनाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे महेश मानेकर यांचे आवाहन
पुणे, दि. ६ नोव्हेंबर
(प्रतिनिधी)
पौराणिक मान्यतेनुसार अश्विन कृष्ण त्रयोदशीला देव दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी अमृतकलश घेऊन प्रकट झाले.त्यांना देवांचे वैद्य आणि आयुर्वेदाचे अधिष्ठाता मानले जाते.त्यामुळे या दिवसाला धन्वंतरी जयंती संबोधिले जाते.धनत्रयोदशीला धनप्राप्तीचा दिवस बरोबरच आरोग्य व दीर्घायुष्याची कामना करण्याचा दिवस म्हणून महत्व आहे.धनसंपत्तीबरोबरच निरोगी शरीर व दीर्घायुष्य हीच खरी संपत्ती असल्याची भावना या दिवशीची आहे.
सेवा आरोग्य फाऊंडेशनच्या वतीने धनत्रयोदशीनिमित्त शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी समाज मंदिर,कर्वेनगर,हिंगणे होम कॉलनी,पुणे येथे धन्वंतरी पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सेवा आरोग्य फाऊंडेशनचे संचालक संजय भालेराव यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन संपन्न झाले.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर सेवा प्रमुख महेश सदाशिव मानेकर उपस्थित होते.तसेच केशव माधव विश्वस्त निधीचे सचिव अरविंद देशपांडे,विश्वस्त प्रशांत कुलकर्णी,प्रकाश देशपांडे,नगरसेविका रेश्मा बराटे,नगरसेविका रूपाली पवार,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संभाजीभाग संघचालक अनिल व्यास,भाग कार्यवाह रवींद्र लाटे,संघाचे संभाजी भागातील पदाधिकारी,स्वयंसेवक यांच्यासह सेवा आरोग्य फाऊंडेशनचे पदाधिकारी, संचालक,डॉक्टर्स,व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक महेश मानेकर यांनी ‘पंच परिवर्तन’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.स्वबोध,नागरी कर्तव्य,कुटुंब प्रबोधन,पर्यावरण संवर्धन व पाणीबचत,सामाजिक समरसता आणि आरोग्य या विषयांवर त्यांनी विशेष भर दिला.संविधानातील मूल्यांनुसार प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. समाजात समरसता निर्माण झाली पाहिजे,पर्यावरणाचे संवर्धन झाले पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे,असे त्यांनी सांगितले.
“सेवा आरोग्य फाऊंडेशन”च्या माध्यमातून वस्त्यांमध्ये सुरू असलेले आरोग्यविषयक व सामाजिक कार्य उल्लेखनीय असून,या कार्याची गुणवत्ता अधिक वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे,असे मत त्यांनी व्यक्त केले.संभाजी भागातील एकूण ४५ वस्त्यांपैकी ४४ वस्त्यांमध्ये सेवा आरोग्य फाऊंडेशन कार्यरत आहे, ही अत्यंत गौरवाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नगरसेविका रेश्मा बराटे यांनी कर्वेनगर व कोथरूड परिसरात सेवा आरोग्य फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध वस्त्यांमध्ये सुरू असलेले कार्य निश्चितच उल्लेखनीय असल्याचे सांगितले.नगरसेविका रूपाली पवार यांनीही फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक करत भविष्यात सेवा आरोग्यच्या कार्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
डॉ हर्षदा पाध्ये यांनी आपल्या मनोगतात आयुर्वेदातील विविध संकल्पना मांडल्या.डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नाते अधिक दृढ होणे आवश्यक असून,डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे रुग्णांनी पालन करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
रवींद्र शिंगणापूरकर यांनी पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले.कार्यकर्ता प्रतिनिधी म्हणून योगिता कदम यांनी मनोगत व्यक्त केले.सेवा आरोग्य फाऊंडेशनच्या माध्यमातून वस्त्यांमध्ये सुरू असलेल्या कार्याला समाजातून आणि वस्त्यांमधून मिळणारा पाठिंबा व सहकार्य यामुळे कार्यकर्त्यांना अधिक बळ मिळते,असे त्यांनी सांगितले.
यावेळी केशव माधव विश्वस्त निधी या सामाजिक संस्थेच्यावतीने सेवा आरोग्य फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांना,सेवेकऱ्यांना दिवाळीनिमित्त फराळाची भेट देण्यात आली.कार्यकर्त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी आनंददायी ठरला.
कार्यक्रमाला सेवा आरोग्य फाऊंडेशनचे रवींद्र शिंगणापूरकर,मनोज देशमुख, डॉ हर्षदा पाध्ये,विनायक देशपांडे, राधिका देशपांडे,नितीन उंडे यांच्यासह संस्थेचे सर्व कार्यकर्ते व डॉक्टर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवा आरोग्य फाऊंडेशनचे कार्यालय प्रमुख बापू शिंदे यांनी केले,तर संस्थेचे संचालक मनोज देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.


