Friday, November 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedविशेष लेख  *पुणे जिल्ह्याचे असे...

विशेष लेख  *पुणे जिल्ह्याचे असे नियोजन ; चारा टंचाईवर होईल मात*

 

 

बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी पुरेसा आणि सकस चारा उपलब्ध असणे ही मोठी गरज बनली आहे. संभाव्य चारा टंचाईचे संकट उद्भवण्यापूर्वीच त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पुणे जिल्हा प्रशासनाने नियोजनबद्ध पावले उचलली आहेत. जिल्ह्यात तब्बल २५ हजार एकर क्षेत्रावर चारा लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यासाठी मका आणि कडवळ या चारा पिकांच्या बियाण्यांचे वितरण सुरू आहे. महाबीज आणि राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून प्राप्त झालेल्या २२० टन बियाण्यांपैकी आतापर्यंत ८० टक्के बियाण्यांचे वाटप पूर्ण झाले आहे. उर्वरित बियाण्यांचे वितरणही पुढील आठवडाभरात करण्यात येणार आहे.

 

चारा टंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा तिचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आधीपासूनच चारा उत्पादन वाढविणे, ही या नियोजनामागील प्रमुख भूमिका आहे. मका आणि कडवळ ही चारा पिके पशुधनासाठी उपयुक्त असल्याने त्यांच्या लागवडीला प्राधान्य देण्यात आले आहे. तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत नोंदणीकृत पशुपालक शेतकऱ्यांना बियाण्यांचे वितरण केले जात आहे. उर्वरित बियाणे प्राप्त होताच त्याचेही तातडीने वाटप करण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून अधिकाधिक क्षेत्रावर चारा उत्पादन घेऊन भविष्यातील गरज भागविण्याचा प्रयत्न आहे.

 

**चारा उत्पादनासोबत संवर्धनावरही भर**

केवळ चारा पिकांची लागवड करून संभाव्य टंचाईवर मात करता येणार नाही, तर उत्पादित चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि संवर्धन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींच्या सहभागातून चारा साक्षरता प्रशिक्षण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आयोजित कार्यशाळांमधून पशुपालकांना चारा लागवडीचे नियोजन, उपलब्ध चाऱ्यापासून मुरघास निर्मिती, चाऱ्याची साठवणूक आणि त्याचे दीर्घकाळ संवर्धन याबाबत शास्त्रीय मार्गदर्शन केले जात आहे.

 

हिरवा चारा उपलब्ध असतानाच त्याचा काही भाग मुरघास स्वरूपात साठवून ठेवणे हा टंचाईच्या काळातील महत्त्वाचा पर्याय आहे. त्यामुळे चाऱ्याची उपलब्धता कमी झालेल्या कालावधीतही पशुधनाला पोषक आहार देणे शक्य होते. यासाठी मुरघास निर्मितीचे तंत्र पशुपालकांपर्यंत पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.

 

**अल्प खर्चातील पर्यायी चारा स्रोतांची माहिती**

चारा उपलब्धतेचे पर्याय वाढविण्यासाठी अझोला उत्पादनाचे प्रात्यक्षिकही कार्यशाळांमध्ये दाखविण्यात येत आहे. त्याचबरोबर वाढलेल्या चाऱ्यावर युरिया प्रक्रिया करून त्याची पौष्टिकता वाढविण्याचे तंत्र पशुपालकांना समजावून सांगितले जात आहे. उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करून सकस चारा तयार करणे, चाऱ्याचा अपव्यय टाळणे आणि त्याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करणे, याविषयी पशुवैद्यकीय अधिकारी नियमितपणे मार्गदर्शन करीत आहेत.

 

या उपक्रमांचा उद्देश केवळ चारा उपलब्ध करून देणे एवढाच मर्यादित नसून पशुपालकांना चारा उत्पादन आणि संवर्धनाबाबत सक्षम करणे हाही आहे. त्यामुळे चारा टंचाईच्या काळात बाहेरील स्रोतांवरील अवलंबित्व कमी करण्यास आणि पशुधनाची उत्पादकता टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.

 

**वेळेत नियोजन, पशुधनाच्या सुरक्षिततेला प्राधान्य**

पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. दुधाळ जनावरांचे आरोग्य, दूध उत्पादन आणि पशुपालकांचे आर्थिक उत्पन्न या सर्व बाबींचा चाऱ्याच्या उपलब्धतेशी थेट संबंध आहे. त्यामुळे संभाव्य टंचाईच्या काळात पशुधनाला पुरेसा आणि सकस चारा मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य दिले आहे.

 

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजेश कुमार वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली बियाणे वितरण, चारा लागवड, चारा संवर्धन आणि पशुपालक प्रशिक्षण या सर्व बाबींचे नियोजन करण्यात आले आहे.

 

२५ हजार एकरांवरील चारा लागवडीचे उद्दिष्ट, बियाणे वितरणाची सुरू असलेली मोहीम आणि चारा साक्षरता अभियानातून दिले जाणारे शास्त्रीय मार्गदर्शन या उपाययोजना एकमेकांना पूरक आहेत. चारा टंचाईचे संकट निर्माण होण्यापूर्वीच उत्पादन आणि साठवणुकीची तयारी केल्यास पशुधनाचे संरक्षण करणे अधिक सुलभ होईल. संकट येण्याची वाट न पाहता त्यावरील उपायांची पूर्वतयारी करण्याचा पुणे जिल्ह्याचा हा प्रयत्न पशुपालकांसाठी निश्चितच दिलासादायक ठरणारा आहे.

 

*संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, पुणे*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments