राष्ट्रीय कला अकादमी (न्यास), पुणे आणि श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
पुणे : दिवाळीचा प्रकाश केवळ घरांपुरता मर्यादित न राहता तो माणसांच्या मनापर्यंत पोहोचावा, ज्यांच्या आशीर्वादाने आपले आयुष्य उजळले त्यांच्या आयुष्यातही प्रेम, आपुलकी आणि आनंदाचे क्षण फुलावेत, या भावनेतून निवारा वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत ‘दिवाळीचा पहिला दिवा’ लावण्यात आला.
राष्ट्रीय कला अकादमी (न्यास), पुणे आणि श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवारा संस्थेचे सचिव विजय बलसरे उपस्थित होते. राष्ट्रीय कला अकादमीचे आयोजक अमर लांडे यांच्यासह श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्टचे दिलीप बांदल, दीपक थोरात, रवींद्र फटाले, विश्वास भोर, दिलीप थोरात, मंदार रांजेकर, अतुल सोनवणे, योगेश गोलांडे, रोमा लांडे आणि राष्ट्रीय कला अकादमीचे सर्व सभासद सहभागी झाले होते.
या उपक्रमात ज्येष्ठ नागरिकांसोबत दिवा प्रज्वलन, रांगोळी आणि स्नेहसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिकांसोबत रांगोळी काढून आणि दिवे प्रज्वलित करून दिवाळी साजरी करण्यात आली. त्यांच्याशी संवाद साधत आनंदाचे क्षण अनुभवण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांना प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.


