पुणे, दि. ६ (जिमाका वृत्तसेवा): जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांतर्गत माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा तसेच त्यांच्या पाल्यांना एकूण १० लाख २५ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचे वितरण जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांच्या हस्ते ५ नोव्हेंबर रोजी करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात आयोजित कार्यक्रमात १० लाभार्थ्यांना धनादेशाद्वारे आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. यामध्ये माजी सैनिकांना स्वयंरोजगारासाठी ३ लाख रुपये, सैन्यसेवेत असताना ४६.०४ टक्के अपंगत्व आलेल्या सैनिकास २५ हजार रुपये, सदनिका खरेदीसाठी पाच लाभार्थ्यांना एकूण ४ लाख ५० हजार रुपये, अधिकारी शिक्षण घेत असलेल्या पाल्याच्या माजी सैनिक पालकास १ लाख रुपये, परदेशात शिक्षण घेणाऱ्या पाल्याच्या माजी सैनिक पालकास १ लाख रुपये, तर सैनिकी शाळेत शिक्षण घेणाऱ्या पाल्याच्या माजी सैनिक पालकास ५० हजार रुपये अशी मदत देण्यात आली.
या कार्यक्रमास जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सशस्त्र सेना ध्वजदिन निधीतून या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. देशाच्या संरक्षणासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या शूर सैनिकांच्या कुटुंबीयांना, माजी सैनिकांना, त्यांच्या विधवांना व आश्रितांना आर्थिक आधार देण्यासाठी या निधीचा विनियोग करण्यात येतो.
तरी नागरिकांनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीस सढळ हाताने योगदान देऊन माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी केले आहे.
0000


