Friday, November 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedमधुमेह नियंत्रणासाठी वैयक्तिकृत उपचारपद्धती, लवकर निदान आणि वजनाचे व्यवस्थापन महत्त्वाचे – डॉ....

मधुमेह नियंत्रणासाठी वैयक्तिकृत उपचारपद्धती, लवकर निदान आणि वजनाचे व्यवस्थापन महत्त्वाचे – डॉ. रीमा काशिवा

पुणे, १३ नोव्हेंबर २०२६ : मधुमेहाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी केवळ औषधोपचारच नव्हे, तर आहार, व्यायाम आणि वजनाच्या व्यवस्थापनाबाबतही प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार वैयक्तिकृत दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे, असे मत नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर येथील सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डायबेटिस अँड ओबेसिटी विभागाच्या संचालिका डॉ. रीमा काशिवा यांनी जागतिक मधुमेह दिनानिमित्त व्यक्त केले.

 

आज लहान मुले, किशोरवयीन आणि तरुणांमध्ये टाइप २ मधुमेहाचे प्रमाण वाढत असून, वेळीच निदान आणि योग्य व्यवस्थापन न झाल्यास भविष्यात दीर्घकालीन गुंतागुंती उद्भवू शकतात. त्यामुळे मधुमेहाचे निदान होताच उपचार सुरू करणे महत्त्वाचे आहे. औषधोपचारांसोबतच आहाराच्या सवयी, व्यायामाचे स्वरूप आणि वजन यांचेही नियमित मूल्यमापन केले पाहिजे. प्रत्येकाला एकाच प्रकारचा व्यायाम उपयुक्त ठरेल असे नाही. त्यामुळे गरजेनुसार व्यायामात बदल करणेही आवश्यक असते.

 

स्थूलता हा टाइप २ मधुमेहाचा एक प्रमुख जोखीमकारक घटक आहे. वजन नियंत्रणासाठी आता नवीन औषधे आणि इंजेक्शनद्वारे दिल्या जाणाऱ्या उपचारपद्धती उपलब्ध असून, त्यांचा उपयोग वजन नियंत्रित करण्यासाठी होऊ शकतो. गंभीर स्थूलता असलेल्या निवडक रुग्णांसाठी मेटाबॉलिक आणि बॅरिॲट्रिक शस्त्रक्रिया हा प्रभावी पर्याय ठरू शकतो. वजन कमी केल्याने रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलच्या पातळीतही सुधारणा होते.

 

संतुलित आहार, नियमित चालणे, आठवड्यातून किमान तीन दिवस स्नायू बळकट करणारे व्यायाम, पुरेशी झोप आणि साखरयुक्त शीतपेयांचे सेवन टाळणे या साध्या सवयी मधुमेह नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावतात. स्थूलता म्हणजे आळशीपणा, सडपातळ व्यक्तींना मधुमेह होऊ शकत नाही किंवा इन्सुलिन सुरू करणे म्हणजे आजाराची शेवटची अवस्था, असे अनेक गैरसमज समाजात आहेत. ते दूर होणे गरजेचे आहे.

 

तरुणांमधील वाढता मानसिक ताण, स्क्रीन टाइम, डिजिटल माध्यमांचा अतिवापर आणि मैदानी खेळांचा अभाव हेही चिंतेचे विषय आहेत. तसेच ग्रामीण भागातील मधुमेहींपर्यंत योग्य उपचार आणि मार्गदर्शन पोहोचविण्यासाठी टेलिमेडिसिन प्रभावी ठरू शकते. प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील डॉक्टरांना मार्गदर्शन, तसेच ग्रामीण रुग्णांचे सामूहिक समुपदेशन याद्वारे मधुमेहाविषयी जागरूकता वाढवता येऊ शकते.

 

“मधुमेहाची लक्षणे दिसण्याची वाट पाहू नका. हा आजार अनेक वर्षे निदानाविना राहू शकतो. त्यामुळे वेळोवेळी रक्तातील साखरेची तपासणी करा आणि वेळीच उपचार सुरू करा. योग्य मार्गदर्शन, नियमित उपचार आणि जीवनशैलीतील बदल यांच्या मदतीने मधुमेह नियंत्रणात ठेवून निरोगी आणि सक्रिय जीवन जगता येते,” असे डॉ. काशिवा यांनी

सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments