Friday, November 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedमधुमेहाच्या व्यवस्थापनात रक्तातील साखरेसोबतच 'हाडे आणि सांध्यांच्या आरोग्याकडे'ही लक्ष देणे गरजेचे –...

मधुमेहाच्या व्यवस्थापनात रक्तातील साखरेसोबतच ‘हाडे आणि सांध्यांच्या आरोग्याकडे’ही लक्ष देणे गरजेचे – तज्ज्ञांचा सल्ला *जागतिक मधुमेह दिन

पुणे, 13 नोव्हेंबर २०२६ : मधुमेहाचा विपरीत परिणाम केवळ रक्तातील साखरेच्या पातळीपुरता मर्यादित नसून, हाडांची मजबुती, सांध्यांची हालचाल आणि एकूणच स्नायू व हाडांच्या आरोग्यावरही होऊ शकतो. जागतिक मधुमेह दिनानिमित्त तज्ज्ञांनी या दुर्लक्षित राहणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधत, रुग्णांची हालचाल करण्याची क्षमता आणि स्वावलंबन टिकवून ठेवण्यासाठी हाडे व सांध्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

 

रक्तातील साखरेची पातळी दीर्घकाळ वाढलेली राहिल्यास हाडांची अंतर्गत रचना आणि त्यातील कोलॅजनवर परिणाम होऊन हाडांची लवचिकता व मजबुती कमी होऊ शकते. त्यामुळे फ्रॅक्चरचा धोका वाढतो. टाइप २ मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये मधुमेह नसलेल्या व्यक्तींच्या तुलनेत खुब्याचे फ्रॅक्चर होण्याचा धोका अधिक असतो. विशेष म्हणजे, हाडांची घनता सामान्य किंवा अधिक असली तरीही हा धोका कायम असू शकतो. याशिवाय फ्रोजन शोल्डर, स्नायूंची कमजोरी, मज्जातंतूंचे नुकसान आणि शरीराचा तोल सांभाळण्यात अडचणी अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पडून दुखापत होण्याची शक्यता वाढते. मधुमेह नियंत्रणात नसल्यास फ्रॅक्चर भरून येण्यासही विलंब होऊ शकतो.

 

लोकमान्य हॉस्पिटल्सचे कन्सल्टंट फिजिशियन डॉ. प्रणित पटणी म्हणाले, “मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये हाडांची घनता सामान्य असली तरी हाडांची प्रत्यक्ष मजबुती सामान्य असेलच असे नाही. भारतात सामान्यपणे आढळणारी ड जीवनसत्व आणि कॅल्शियमची कमतरता हाडांच्या आरोग्याच्या समस्या अधिक गंभीर करू शकते. त्यामुळे मधुमेहाचे व्यवस्थापन केवळ रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यापुरते मर्यादित न राहता हाडांची मजबुती जपणे, सांध्यांची हालचाल कायम ठेवणे आणि पडून होणाऱ्या दुखापती टाळणे यांनाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. यामुळे व्यक्तीचे स्वावलंबन आणि जीवनमान टिकवून ठेवण्यास मदत होते.”

 

हाडांचे आरोग्य जपण्यासाठी वेळोवेळी आवश्यक तपासण्या करणे, पुरेशा प्रमाणात कॅल्शियम व व्हिटॅमिन डी घेणे, प्रथिनयुक्त संतुलित आहार घेणे आणि नियमित चालणे महत्त्वाचे आहे. यासोबतच स्नायूंची ताकद आणि शरीराचा तोल सुधारण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. वय आणि वैयक्तिक जोखमीचे घटक लक्षात घेऊन, विशेषतः ज्येष्ठ नागरिक तसेच यापूर्वी फ्रॅक्चर किंवा वारंवार पडण्याचा अनुभव असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने डेक्सा बोन डेन्सिटी तपासणी करून घ्या

वी.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments