भारताच्या इतिहासामध्ये डोकावून पाहत असताना राघोजी रामजी भांगरे या आदिवासी समुदायातील आद्यक्रांतिकारकांनी १८५७ च्या उठावाच्याही आधी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. आदिवासींच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरात लिहिले जावे असे ते एक महान क्रांतिकारक होऊन गेले. तत्कालीन काळामध्ये राघोजी भांगरे यांच्या नावाने सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये आदिवासींचा बुलंद आवाज घुमत होता. इंग्रजांच्या विरोधात लढा जर कोणी दिला असेल आणि आदिवासी समुदायांमध्ये सर्वप्रथमता क्रांतीची ज्योत जर कोणी पेटवली असेल तर ती राघोजी भांगरे यांनी पेटवली. ज्यामुळे आदिवासी समाजाने स्वतःला स्वातंत्र्य युद्धाच्या अग्नीत झोकून दिले.
जुलमी ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये सिंहगर्जना करणाऱ्या आदिवासी आद्य क्रांतिकारक राघोजींच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणे ही काळाची गरज आहे. त्यांनी जो जिक्रिरीने लढा दिला तो लढा रात्रीच्यावेळी आकाशामध्ये शुक्रतारा जसा टपोर दिसावा, अगदी त्याप्रमाणे त्यांचं नाव व कार्य आपल्याला दिसेल.
राघोजी भांगरे यांचा जन्म ८ नोव्हेंबर १८०५ रोजी अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील देवगाव येथे आदिवासी समाजातील महादेव कोळी कुटुंबात झाला. त्यांचे वडील रामजी भांगरे हे देखील शूर योद्धे आणि किल्लेदार होते. आदिवासी समाजावर होत असलेला अत्याचार दूर करण्यासाठी विविध भागातून आदिवासी लोकांना अन्यायातून सुटका करण्यासाठी आदिवासी समाजात वीर पुरुषाचा जन्म झाला. आदिवासी समाजाच्या जखमांवर मलम लावण्याचे काम राघोजींच्या कार्यामुळे झाले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेला रतनगड हा सह्याद्रीच्या डोंगररांगांतील अत्यंत मोक्याचा किल्ला आहे. महादेव कोळी हा आदिवासी समाज परंपरागतपणे या किल्ल्याचा रक्षक होता. ब्रिटिशांनी जेव्हा रतनगड ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा राघोजींचे वडील रामजी भांगरे यांनी गोविंदराव खाडे आणि रामा किरवा यांच्या मदतीने १८२१ मध्ये रतनगडावर जाहीर बंड केले. त्या बंडात राघोजी भांगरे हे त्यांच्या वडीलासोबत वयाच्या १६ व्या वर्षी सहभागी झाले होते. इंग्रज अधिकारी कॅप्टन मॅकिंटॉश याने ५,००० सैन्य घेवून गडावर चाल केली. पण रामजी भांगरे यांच्या अवघ्या ५०० आदिवासी सैनिकांनी त्यांना कडवी झुंज दिली. मॅकिंटॉशला मदतीसाठी आणखी २,००० सैन्य मागवावे लागले. या युद्धात आदिवासींनी इंग्रजांचे सुमारे ३,५०० सैनिक मारले गेले. हे युद्ध रोघोजी भांगरे यांनी पाहिलेले पहिले युद्ध होते. मात्र शेवटी रामजी भांगरे यांना अटक होऊन काळ्या पाण्याची शिक्षा झाली. पिता आणि पुत्र एकाच युद्धामध्ये रणांगणावर आपले शौर्य दाखवीत होते. असा दुर्मिळ आणि एकमेकाद्वितीय प्रसंग इतिहासाच्या पानावर क्वचितच पाहायला मिळतो.
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राघोजी भांगरे आणि त्यांचे बंधू बापूजी भांगरे यांनी महादेव कोळी व भिल्ल तरुणांच्या टोळ्या संघटित केल्या. १८३८ मध्ये त्यांनी रतनगड आणि सनगर किल्ल्यांच्या परिसरात इंग्रज सत्तेविरुद्ध मोठा उठाव केला. राघोजींना सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांची आणि चोर वाटांची संपूर्ण माहिती होती. ते इंग्रजी फौजांवर अचानक छापे टाकून डोंगरात गायब होत असत. हे बंड मोडून काढण्यासाठी कॅप्टन मॅकिंटॉशने गडाकडे जाणारे सर्व घाट, रस्ते आणि जंगल मार्ग रोखून धरले. इंग्रजांनी रस्ते अडवल्यानंतरही राघोजी मागे हटले नाहीत. त्यांनी इंग्रजांच्या ताब्यातील तीन गावांवर हल्ला करून सरकारी तिजोरी लुटली आणि जुलमी सावकारांची कागदपत्रे जाळून टाकली.
पेशवाईमध्ये आदिवासी समाजाला वतनदारीचे हक्क मिळालेले होते. पेशवाईच्या अस्तानंतर (१८१८) ब्रिटिशांनी महादेव कोळी समाजाचे सह्याद्रीतील किल्ल्यांचे आणि घाटमाथ्याचे परंपरागत रक्षणाचे अधिकार काढून घेतले. आणि मोठ्या प्रमाणात अन्याय चालू केला. या अन्याया विरोधात बंड करून आपले हक्क मिळवणे हे राघोजीं समोर लक्ष होते. आणि हे हिरावून घेतलेले हक्क आणि अधिकार परत मिळविण्यासाठी त्यांनी जीवाची बाजी लावली. १८२८ मध्ये ब्रिटिशांनी शेतसारा प्रचंड वाढवला. कर भरण्यासाठी गरीब शेतकऱ्यांना सावकारांकडून भरमसाठ व्याजाने कर्ज घ्यावे लागले होते. त्याबदल्यात सावकार त्यांच्या जमिनी बळकावू लागले. कर्जाच्या नावाखाली आदिवासी समाजातील जमिनी सावकार मोठ्या प्रमाणात हडप करत होते. हा अन्याय मोडून काढण्यासाठी राघोजींनी ठाम निर्णय घेतला. सुरुवातीला राघोजी भांगरे ब्रिटिश सरकारच्या सेवेत होते. परंतु नोकरीत होणारा अपमान, पगारातील कपात आणि त्यांच्या कुटुंबावर इंग्रज अधिकाऱ्यांनी केलेले अत्याचार यामुळे त्यांनी नोकरी सोडून बंडाचे निशाण हाती घेतले.
राघोजींनी आपले बंधू बापूजी भांगरे आणि सहकाऱ्यांच्या मदतीने अकोले, जुन्नर, नाशिक, ठाणे, पुणे आणि सातारा परिसरात इंग्रज व जुलमी सावकारांविरुद्ध मोठा उठाव केला. ते जुलमी सावकारांची संपत्ती आणि कर्जाची कागदपत्रे जाळून लुटलेले धन गोरगरिबांना वाटून देत असत. त्यामुळे सामान्य जनतेत त्यांना देवासारखा मान होता. गनिमी काव्याने लढणाऱ्या राघोजींना पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्याकाळी ५,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. ते अत्यंत कडक शिस्तीचे आणि महिलांचा नितांत आदर करणारे नेते होते. ते महादेवाचे निस्सीम भक्त होते.
राजूर मोहीमः अकोले आणि राजूर परिसरात शेतकऱ्यांची जमीन बळकावणाऱ्या सावकारांवर त्यांनी अनेक हल्ले केले. आणि आदिवासी समाजाची जमीन सोडवण्यास शेतकऱ्यांना मदत केली. राघोजींच्या दहशतीमुळे अनेक सावकार राजूर भाग सोडून पळून गेले. जुन्नर आणि नाशिकचा लढा (१८४४-१८४५): १८४४ ते १८४५ या काळात राघोजींचा उठाव शिगेला पोहोचला होता. त्यांनी उत्तर पुणे, जुन्नर, आंबेगाव, खेड आणि नाशिक जिल्ह्यातील इंग्रज ठाण्यांवर हल्ले केले. जुन्नर येथे त्यांचा कॅप्टन मॅकिंटॉशच्या फौजेशी मोठा संघर्ष झाला. या संघरर्षात इंग्रजांना त्यांनी पळवून लावले.
भिल्ल आणि कोळी ऐक्यः त्यांनी फक्त महादेव कोळी समाजच नव्हे, तर खानदेश आणि नगरमधील भिल्ल नायकांना देखील इंग्रजांविरुद्ध एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. १८४८ मध्ये पंढरपूर येथे भिल्ल सरदारांची भेट घेऊन मोठ्या लढ्याची योजना आखून इंग्रजांना पळता भुई थोडी केली. सर्व आदिवासी समाजाला एकत्र करून अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तयार केले. समाजाला संघटित करून अन्यायाची जाणीव करून लढण्यास प्रवृत्त करण्याचे कार्य राघोजी भांगरेंनी केले.
इंग्रज अधिकारी कॅप्टन गेल याने राघोजींचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम राबवली. १८४८ मध्ये पंढरपूर येथे वेषांतर करून देवदर्शनासाठी आणि भिल्ल नायकांना एकत्र आणण्यासाठी आलेले राघोजी भांगरेंना इंग्रजांनी विश्वासघाताने अटक केली. ठाणे येथील न्यायालयात त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. त्यांनी स्वतः आपली बाजू निर्भीडपणे मांडली. अखेर २ मे १८४८ रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृहात त्यांना फाशी देण्यात आली. त्यांची समाधी शहापूर तालुक्यातील उंबरमाळी (उंभ्रई) येथे आहे.
राघोजी भांगरे महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत ब्रिटिश सत्ता आणि सावकारी जुलमाविरोधात सशस्त्र लढा उभारणारे एक महान आदिवासी आद्यक्रांतिकारक होते. १८५७ च्या स्वातंत्र्य समराच्याही आधी त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. आजही आदिवासी समाजात त्यांच्या लढाईच्या गाथा सांगीतल्या जातात. आजही आदिवासी समाजात त्यांच्या समाधीच्या जागी आदिवासी समाजातील लोक मोठया आदराने आणि श्रद्धेने नतमस्तक होतात.
0000


