पुणे : निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, असे आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करतो. रामायण आणि महाभारतातील सद्गुण जर एका ठिकाणी पाहायचे असतील, तर ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतात. जगाला वंदनीय असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार, विचार आणि कार्य हिंदुस्थानला आजही प्रेरणादायी आहेत. हिंदुस्थान खऱ्या अर्थाने सर्वांगीण वैभवशाली करायचा असेल, तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची आजही गरज आहे, असे मत श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी व्यक्त केले.
माहेश्वरी परिवार फाउंडेशन आणि समस्त माहेश्वरी समाज, पुणे यांच्या वतीने महालक्ष्मी लॉन्स येथे प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या ‘राजर्षी शिवछत्रपती स्फूर्ती गाथा’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. फाउंडेशनचे अध्यक्ष के. सी. चांडक, स्वागताध्यक्ष वसंत राठी, सचिव सुनील बियाणी, सल्लागार शेखर मुंदडा, मुख्य प्रायोजक नितीन न्याती, मनोज झंवर, मनोज जाजू, राहुल नवंदर, मुरली सारडा, दीपक काबरा, चंदू मंत्री आदी यावेळी उपस्थित होते.
प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य ज्या प्रमाणात आपण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायला हवे होते, त्या प्रमाणात पोहोचवले गेले नाही. त्यासाठीच मी व्याख्यानांच्या माध्यमातून या दोन महान राष्ट्रपुरुषांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असतो. पुढील पिढी सक्षम घडवायची असेल, तर या महान पुरुषांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि शिकवण आपण खरोखरच आपल्या आयुष्यात अंगीकारली आहे का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. महाराजांचे महान व्यक्तिमत्त्व आपण आदर्श मानतो; परंतु त्यांच्या गुणांवर आधारित आदर्शवत जीवन आपण खरोखरच जगत आहोत का, याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. इस्रायलपासून अमेरिकेपर्यंत आणि ऑस्ट्रेलियापासून चीनपर्यंत सर्व देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय मानले जातात. आपल्या मातीत इतका महान राष्ट्रपुरुष जन्माला आला, याबद्दल आपण स्वतःला भाग्यवान मानले पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीही केवळ स्वतःच्या कुटुंबासाठी, समाजासाठी अथवा जातीपुरते काम केले नाही, तर हिंदवी स्वराज्याची स्थापना आणि विश्वकल्याणाची भावना त्यांच्या कार्यातून कायम दिसून येते. त्यामुळेच त्यांचे कार्य आणि विचार काळाच्या कसोटीवर टिकून राहिले आहेत आणि यापुढेही हजारो वर्षे टिकून राहतील. हे विचार आपण विविध माध्यमांतून पुढील पिढीपर्यंत पोहोचवले पाहिजेत. पुढील पिढी संस्कारक्षम झाली, तरच खऱ्या अर्थाने वैभवशाली हिंदुस्थान घडविता येईल. छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तिमत्त्व, विचार आणि कार्य यांचा आदर्श घेऊन ते प्रत्यक्ष जीवनात अंगीकारल्यासच हे शक्य आहे, असेही प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी सांगितले.
वसंत राठी यांनी प्रास्ताविक केले. पंकज मानधने यांनी सूत्रसंचालन केले. व्याख्यानापूर्वी माहेश्वरी परिवार फाउंडेशन आणि समस्त माहेश्वरी समाज, पुणे यांच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली.
१४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ ते ७.३०, तसेच १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १२.३० या वेळेत प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांची व्याख्याने होणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.


