“स्वातंत्र्योत्तर बलशाली भारताचे” स्वप्न.. स्वातंत्र्यपूर्व काळापासून नेहरूच्या ठायी होते —- प्रा विशाल पतंगे
प्रतिगम्यांच्या विरोधातील संस्कृतिक संघर्षात नेहरूजी पुरोगमी चळवळी साठी मार्गदर्शक , — राजेश मूंढे .
पुणे दि – १४ नोव्हेंबर
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे आधुनिक भारताचे शिल्पकार व रचनाकार आहेत.संस्था उभारणी, धर्मनिरपेक्ष राज्य, समाजवादी अर्थकारण आणि अलिप्ततावादी परराष्ट्र धोरण हे नेहरुवादाचे आधारभूत असे चार स्तंभ आहेत. या आधारावरच मजबूत अशा भारत राष्ट्राची उभारणी झाली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेहरू अभ्यासक प्रा विशाल रावसाहेब पतंगे (नांदेड) यांनी नेहरू जयंती निमित्त काँग्रेस भवन येथील व्याख्यान प्रसंगी केले. ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेस (सिव्हिल सोसायटी, पॉलिसी अँड रिसर्च विभाग) यांच्या वतीने आयोजित नेहरू जयंती निमित्ताने ‘भारत भाग्यविधाता’ या पंडित नेहरू विषयी विशेष व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे नेते वरिष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळ दादा तिवारी हे होते.
पुढे बोलताना पतंगे म्हणाले की, “स्वातंत्र्य लढा सुरू असतानाच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्योत्तर भारताचे संकल्पचित्र रेखाटण्यास सुरुवात केलेली होती. 1928 चा नेहरू रिपोर्ट, 1931 च्या कराची काँग्रेस अधिवेशनातील “मूलभूत हक्क आणि आर्थिक कार्यक्रम” यावरील प्रस्ताव, 1936 च्या निवडणुकांचा जाहीरनामा आणि 1938 मध्ये काँग्रेस अध्यक्ष सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या ‘राष्ट्रीय नियोजन समिती’चे अध्यक्ष म्हणून केलेल्या कामातून नेहरूंनी आधुनिक व स्वतंत्र भारताचे संकल्प चित्र रेखाटलेले होते. नेहरुंनी आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक संस्थांची स्थापना केलेली होती परंतु त्यांचा खरा भर वैज्ञानिक संस्थान निर्मितीवर होता. अज्ञान, दारिद्र्य, विषमता यापासून विज्ञानच मुक्ती देऊ शकते आणि आपण केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळवले आहे. या सर्व प्रकारच्या संस्था निर्मितीतून आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त केल्याशिवाय मिळालेले स्वातंत्र्य पूर्णत्वास जाऊ शकत नाही, या जाणिवेतूनच नेहरूंनी ही संस्था निर्मिती केली. प्रत्येक भारतीयाच्या जीवनाला सुखी व समृद्ध करण्यामध्ये नेहरूंनी निर्माण केलेल्या कोणत्या ना कोणत्या तरी संस्थेचा वाटा आहे, एवढ्या व्यापक प्रमाणात नेहरूंनी संस्था निर्मिती केली आहे. आपण आज नेहरूंवर टीका करू शकतो परंतु आपल्या जीवनातून नेहरूंना वजा करू शकत नाही.
कॉँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांनी आपल्या औपचारीक अध्यक्षीय भाषणात म्हणाले की समृद्ध सांविधानिक लोकशाही करीता ‘देशाचा स्वातंत्र्य इतिहास’ अवगत असणे व तो सर्वांपर्यन्त पोहोचवणे ही आज देशाची खरी गरज असून ते खऱ्या भारतीयाचे लक्षण आहे. पंडित नेहरूंनी देशाचा निकालभिमुख (result oriented) विकासात्मक पाया रचण्यासाठी अत्यंत व्यावहारिक दुरदृष्टीने व समान विकासात्मक धोरणाच्या अनुषंगाने ‘योजना-आयोग’ स्थापित केला मात्र दूरदृष्टि व उत्तरदायित्वचा अभाव असलेल्या सरकारने तो बरखास्त केला हे देशाचे दुर्दैव असल्याची टीका त्यांनी केली.
या वेळी पुणे शहर पूर्व व पश्चिम अध्यक्ष श्रीमती दीप्ती चवधरी, प्रशांत जगताप, प्रदेश कॉँग्रेस सांस्कृतिक विभाग कार्याध्यक्ष राजेश मुंढे, राज्य प्रवक्ते हनुमंत पवार, भाऊसाहेब आसबे, अर्चना शाह, सौरभ अमराळे इ सह सिव्हिल सोसायटी सदस्य प्रशांत कोठडिया, प्रसाद झावरे, अरविंद पखाले, विवेक काशिकर इ. उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश प्रोफेशनल कॉँग्रेसच्या सिव्हिल सोसायटी, पॉलिसी अँड रिसर्च विभागाच्या वतीने विभागाच्या राज्यप्रमुख जिविका उठडा यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
जिविका उठडा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तसेच AIPC चे सदस्य व ज्येष्ठ कार्यकर्ते विक्रम देशमुख यांनी मान्यवरांचे स्वागत केले व आभार प्रदर्शन अवनीश माने यांनी केले!!
—————///—————-


