पुणे, नोव्हेंबर २०२६: डॉ. डी. वाय. पाटील समूहाच्या ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटीच्या (DPGU) स्कूल ऑफ लिबरल आर्ट्समध्ये अभिजात मराठी भाषा अध्ययन केंद्र तसेच मीडिया अँड कम्युनिकेशन आणि तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र , अर्थशास्त्र (PPE) या दोन नव्या विभागांचे उद्घाटन महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना भाषा, संस्कृती, माध्यमे आणि चिकित्सक विचार या क्षेत्रांमध्ये व्यापक शैक्षणिक संधी उपलब्ध होणार आहेत.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठाच्या परिसराला भेट देऊन नव्याने उभारण्यात आलेल्या सुविधा आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधांची पाहणी केली. मीडिया अँड कम्युनिकेशन विभागातील व्यावसायिक दर्जाचे कॅमेरे, ऑडिओ सिस्टीम आणि मॉनिटरिंग उपकरणांनी सुसज्ज स्टुडिओमध्ये विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणही त्यांनी पाहिले. विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक प्रकल्प सादर करत त्यांच्या अभ्यासक्रमातील प्रत्यक्ष अनुभवांची माहिती दिली. यावेळी मंत्र्यांनी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधत जिज्ञासा, आत्मविश्वास आणि उद्देशपूर्ण शिक्षणावर भर देण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी DPGU चे प्रो-चॅन्सलर डॉ. सोमनाथ पी. पाटील म्हणाले, “या नव्या उपक्रमांचे उद्घाटन केल्याबद्दल आम्ही चंद्रकांत (दादा) पाटील यांचे आभारी आहोत. भाषा आपली ओळख घडवते, संवाद आपल्याला अभिव्यक्तीची ताकद देतो, तर चिकित्सक विचार भविष्यातील दिशा दाखवतो. अभिजात मराठी भाषा अध्ययन केंद्र आणि नव्या विभागांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या मुळांशी जोडलेले राहतानाच जागतिक स्तरावरील संधींसाठी तयार व्हावे, हा आमचा उद्देश आहे. प्रश्न विचारण्याला प्रोत्साहन, विचारांचा सन्मान आणि जबाबदार नागरिक घडविणारे शिक्षण देण्यावर आमचा भर आहे.”
अभिजात मराठी भाषा अध्ययन केंद्राच्या माध्यमातून मराठी भाषा, साहित्य आणि सांस्कृतिक वारशाचा सखोल अभ्यास, संशोधन आणि संवर्धनाला चालना देण्यात येणार आहे. मीडिया अँड कम्युनिकेशन विभागात पत्रकारिता, प्रभावी कथनशैली, डिजिटल निर्मिती आणि जबाबदार माध्यम व्यवहार यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर PPE विभागाच्या माध्यमातून तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयांचा आंतरशाखीय अभ्यास करून विद्यार्थ्यांना सामाजिक व्यवस्था, प्रशासन, शासनपद्धती आणि समकालीन सार्वजनिक धोरणांचे चिकित्सक विश्लेषण करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम केले जाणार आहे.
या कार्यक्रमात विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. नव्या केंद्र आणि विभागांमुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांचा परस्परसंबंध समजून घेण्याची तसेच पारंपरिक विषयांच्या पलीकडे जाऊन आंतरशाखीय शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. भाषा, संस्कृती, संवाद आणि चिकित्सक विचार यांची सांगड घालत ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सकडून समाजासाठी जागरूक, जबाबदार आणि सकारात्मक योगदान देणारी युवा पिढी घडविण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे.


