भारताच्या मोबिलिटी आणि उत्पादन क्षेत्रातील पुढील झेप अधोरेखित करणारे प्रदर्शन व परिषद
* इलेक्ट्रिक मोबिलिटी, प्रगत ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स, सरफेस इंजिनिअरिंग, स्मार्ट कोटिंग्ज आणि शाश्वत उत्पादन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान व नवकल्पनांचे प्रदर्शन
* टाटा मोटर्स, व्हॅरॉक, स्कोडा ऑटो फोक्सवॅगन, महिंद्रा अँड महिंद्रा, जीई एअरोस्पेस, ब्रिजस्टोन यांसह आघाडीच्या कंपन्यांमधील नेतृत्व भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या भवितव्यावर करणार विचारमंथन
* ऑटोमोटिव्ह , इंजिनिअरिंग, संरक्षण आणि औद्योगिक क्षेत्रातील आघाडीच्या खरेदीदारांना तंत्रज्ञान पुरवठादारांशी जोडण्यासाठी विशेष व्हेंडर डेव्हलपमेंट मीट्सचे आयोजन
पुणे, १६ नोव्हेंबर २०२६ : भारताला जागतिक स्तरावरील उत्पादन आणि मोबिलिटी क्षेत्रातील आघाडीचे केंद्र बनविण्याच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू असताना, द कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) पश्चिम विभागातर्फे चौथ्या ‘सीआयआय नेक्स्टजेन मोबिलिटी शो २०२६’ आणि ‘सीआयआय सरफेस कोटिंग शो २०२६’चे आयोजन १९ ते २१ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये करण्यात आले आहे. पाच हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळावर होणाऱ्या या प्रदर्शनांना आठ हजारांहून अधिक लोक भेट देतील, अशी अपेक्षा आहे. उत्पादन, तंत्रज्ञान, संशोधन आणि धोरणनिर्मिती क्षेत्रातील प्रमुख घटकांना एकत्र आणणारे हे प्रदर्शन मोबिलिटीचे भविष्य, प्रगत उत्पादन तंत्रज्ञान आणि शाश्वत औद्योगिक विकासाला दिशा देणाऱ्या नव्या संकल्पना आणि उपाययोजना सादर करणार आहे.
‘स्पीड, स्केल, सस्टेनेबिलिटी’ (वेग, विस्तार आणि शाश्वतता) या संकल्पनेवर आधारित ‘नेक्स्टजेन मोबिलिटी शो’मध्ये इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्टवेअर आधारित वाहने, कनेक्टेड मोबिलिटी, पर्यायी इंधने आणि स्मार्ट उत्पादन प्रणाली यांमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन होणार आहे. याचवेळी आयोजित चौथ्या ‘सीआयआय नेक्स्टजेन मोबिलिटी समिट’मध्ये व्हॅरॉक, स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया, टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी, ब्रिजस्टोन इंडिया, युनो मिंडा, यझाकी इंडिया आणि एआरएआय यांसारख्या संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन, पुरवठा साखळीची सक्षम व्यवस्था, पुरवठादारांची स्पर्धात्मकता आणि जागतिक ऑटोमोबाईल मूल्य साखळीतील भारताची वाढती भूमिका या विषयांवर यावेळी चर्चा होईल.
यासोबतच ‘कोटिंग द फ्युचर : इनोव्हेशन, सस्टेनेबिलिटी अँड डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन’ या संकल्पनेवर आधारित ‘सीआयआय सरफेस कोटिंग शो २०२६’मध्ये औद्योगिक कोटिंग्ज, करोजन प्रोटेक्शन तंत्रज्ञान, सरफेस इंजिनिअरिंग, ऑटोमेशन आणि प्रगत मटेरियल्स क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान मांडण्यात येणार आहे. चौथ्या ‘सीआयआय सरफेस कोटिंग समिट’मध्ये जीई एअरोस्पेस, आयआयटी बॉम्बे, आर्सेलरमित्तल निप्पॉन स्टील इंडिया, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स, चुगोकू पेंट्स इंडिया आणि श्री रसायनी या संस्थांमधील तज्ज्ञ सहभागी होतील. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, प्रेडिक्टिव्ह ॲनालिटिक्स आणि स्मार्ट कोटिंग्ज यांसारख्या तंत्रज्ञानामुळे औद्योगिक उत्पादकता, कार्यक्षमता आणि शाश्वततेमध्ये कशा प्रकारे परिवर्तन घडत आहे, यावर या परिषदेत विचारमंथन होणार आहे.
या प्रदर्शनाचे महत्त्व अधोरेखित करताना सीआयआय पश्चिम विभागाचे अध्यक्ष (२०२६-२७) आणि ब्लू स्टार लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. वीर एस. अडवाणी म्हणाले की, भारताच्या उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी नवकल्पना, तंत्रज्ञानाचा प्रभावी स्वीकार आणि जागतिक मूल्य साखळीशी अधिक दृढ एकात्मता महत्त्वाची ठरणार आहे. ऑटोमोबाईल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील पुण्याची भक्कम औद्योगिक परिसंस्था उद्योगांमधील सहकार्य वाढविण्यासाठी आणि देशाच्या औद्योगिक विकासाच्या पुढील टप्प्याला गती देण्यासाठी अनुकूल ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय उद्योग क्षेत्रातील मान्यवर श्री. अरविंद गोयल, श्री. मिलन के. नाग, श्री. रजनीकांत बेहेरा आणि डॉ. स्मृतिरंजन परिडा यांनीही स्थानिक उत्पादन, पुरवठादारांचा विकास, प्रगत मटेरियल्स आणि डिजिटल तंत्रज्ञान यांचे भारताची जागतिक स्पर्धात्मकता वाढविण्यातील महत्त्व अधोरेखित केले.
प्रदर्शन आणि परिषदांव्यतिरिक्त या उपक्रमांतर्गत विशेष ‘व्हेंडर डेव्हलपमेंट मीट्स’चे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे तंत्रज्ञान पुरवठादार आणि विक्रेत्यांना ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग, संरक्षण तसेच उत्पादन क्षेत्रातील आघाडीच्या औद्योगिक खरेदीदारांशी थेट संवाद साधण्याची आणि व्यावसायिक संधी निर्माण करण्याची संधी मिळणार आहे.
उद्योग, शैक्षणिक संस्था आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारांना एकाच व्यासपीठावर आणणाऱ्या या दोन्ही प्रदर्शनांचा उद्देश नव्या व्यावसायिक संधी निर्माण करणे, पुरवठा साखळी अधिक सक्षम करणे आणि प्रगत उत्पादन व शाश्वत मोबिलिटी क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक केंद्र म्हणून विकसित होण्याच्या प्रक्रियेला
गती देणे हा आहे.


