‘कमांडर’चा यंदाचा ३० वा दिवाळी अंक चरित्रात्मक चित्रपट तथा Biopic विशेषांक आहे. दर वर्षी एखादा विशिष्ट विषय घेऊन त्यावर दिवाळी अंक प्रकाशित करणं हे ‘कमांडर’चं गेल्या २९ वर्षांपासूनचं वैशिष्ट्य यंदाही कायम आहे.
आतापर्यंत आपण अभिनेत्री, अभिनेता, खलनायक – खलनायिका, विनोदी कलावंत, गीत संगीत, दिग्दर्शक, फाळके पारितोषिक विजेते चित्रपट, राष्ट्रीय पारितोषिक विजेते चित्रपट, लोक संस्कृती-लोक परंपरा, युद्ध कोरोना विरुद्ध-जनजागृती, मनोरंजन माईलस्टोन चित्रपट, हॉलीवुड चित्रपट, रंगकर्मी नाटक विशेष आणि युद्धपट देशभक्तीपर चित्रपट असे अनेक विषयांवरील विशेषांक प्रकाशित केलेले आहेत.
बदलत्या काळात नवीन व जुन्या पिढीसाठी प्रेरणादायी म्हणून भारतात साधारण १९३०-४०च्या दशकापासून चरित्रात्मक चित्रपटांची निर्मिती सुरू झाल्याची नोंद आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत हिंदी व मराठी भाषांमध्ये साडेतीनशेच्या वर चरित्रपर किंवा चरित्राधारित चित्रपटांची निर्मिती झालेली आहे. त्यातून या विशेषांकासाठी चित्रपटांची निवड अतिशय कठीण होती. त्यातून निवडक ६३ मराठी हिंदी चरित्रपटांवरचे लेख ह्या अंकात घेतलेले आहेत.
चरित्रपट म्हटल्यावर सर्वप्रथम आठवणाऱ्या ‘संत तुकाराम’, ’, ‘छत्रपती शिवाजी’, ‘छावा’, ‘गांधी’, ‘बालगंधर्व’, , ‘डॉ. काशीनाथ घाणेकर’ ह्या क्लासिक्स म्हणता येतील अशा चरित्रपटांबद्दलची माहिती घेऊन हा अंक सजवला आहे. यावेळी फक्त हिंदी मराठी भाषिक चित्रपटांचाच अंक काढायचं ठरल्याने प्रातिनिधीक म्हणून ‘माल्कम एक्स’ ह्या एका हॉलीवुडच्या चरित्रपटाबद्दलचा लेख समाविष्ट केलेला आहे.
*अंतरंग*
ह्या अंकात दिलीप ठाकूर, डॉ. अविनाश कोल्हे, अभिजित मुळ्ये, राजीव जोशी, डॉ. वि. ल. धारुरकर, श्रीनिवास बेलसरे, रविंद्र देवधर, सना पंडित, उमेश घळसासी, इर्शाद बागवान, डॉ. स्वप्नील तोरणे, डॉ. प्रशांत दांडेकर, प्रफुल्ल फडके, शरद कोरडे, अपर्णा कुलकर्णी, डॉ. अजय कुलकर्णी, सायली वैद्य, सुनील परांजपे, डॉ. जयश्री सोन्नेकर, मंगला तोरणे, विशाल कुलकर्णी, रा. कों. खेडकर, अरुण कुलकर्णी, नीला बर्वे, प्रशांत गौतम, सुधीर सेवेकर, सोहम पिंगळीकर, अजितेम जोशी, धनंजय कुलकर्णी, विलास करंबेळकर, सुधाकर तोरणे, मिलिंद कल्याणकर, बंडा यज्ञोपवीत, श्रीकांत सराफ, दिपक कोनकर, अनिल तोरणे, रमेश धनावडे, देवेंद्र प्रभुणे, रामदास कामत, गिरीश दीक्षित, डॉ. अभय कुलकर्णी, ज्योती हलगेकर – जाधव, दीपक सातपुते, डॉ. अलोक जत्राटकर, सविता मुंबईकर – पाटील, आनंदी विकास, दिपाली लाभे, विवेक वालावलकर, स्मिता ढमामे, कल्पना राऊत, नयना रहाळकर व डॉ. राजू पाटोदकर आदी मान्यवरांचे लेख समाविष्ट आहेत.
एकंदरित नजर फिरवता ‘धर्मात्मा’, ‘संत ज्ञानेश्वर’, ‘अमर भूपाळी’, ‘देवकीनंदन गोपाळा’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘नीरजा’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘बॅण्डिट क्वीन’, ‘भाई’, ‘मीरा’, ‘एक अलबेला’, ‘द डर्टी पिक्चर्स’, ‘भूमिका’, ‘तान्हाजी’, ‘धन्य ते संताजी धनाजी’, ‘लोकशाहीर राम जोशी’, ‘संजू’, ‘सॅम बहाद्दूर’ ह्या चरित्रपटांवरचे लेख वाचकांना प्रेरक ठरतील.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील काही मुख्य व्यक्तीमत्वं ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर’, ‘सरदार’, ‘वीर सावरकर’, ‘महात्मा फुले’, ‘साने गुरुजी’ ह्या चरित्रपटांवरील लेखांशिवाय ह्या अंकाला खचितच पूर्णत्व प्राप्त झालं नसतं. तर ‘पीएम नरेन्द्र मोदी’, ‘ठाकरे’, ‘धर्मवीर’, ‘इमर्जन्सी’, ‘द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’, ‘थलैवी’ हे राजकारणातील आदर्शवत व्यक्तींवरील चरित्रपटांचे लेख वाचकांना प्रेरणादायी ठरतील.
‘माही द अनटोल्ड स्टोरी’, ‘चक दे इंडिया’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘दंगल’, ‘मेरी कोम’ हे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या क्रीडापटूंवरील चरित्रपटांचे लेख क्रीडाप्रेमींसाठी विशेष मेजवानी ठरतील. त्यातही भारताच्या क्रिकेट विश्वचषक विजयाच्या आठवणी ताज्या करणाऱ्या ‘८३’ चित्रपटावरील लेख, आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा जीवनपट उलगडणाऱ्या ‘सचिन अ बिलियन ड्रीम’ ह्या चरित्रपर माहितीपटाबद्दलचा लेख हे दोनही लेख सचिनचे चाहते आणि क्रिकेटप्रेमींना विशेष आनंद देतील ह्याची खात्री वाटते.
आयुष्यात वेगळी वाट चोखाळून किंवा प्रवाहाविरुद्ध पोहून काही जगावेगळं, भव्यदिव्य करून दाखवणाऱ्या व्यक्तींवरील ‘मी सिंधुताई सपकाळ’, ‘पॅडमॅन’, ‘सरबजित’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘मांझी द माऊंटन मॅन’, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘द डायरी ऑफ विनायक पंडित’, ‘ट्वेल्थ फेल’, ‘पान सिंह तोमर’, ‘अलीगढ’, ‘शाहिद’ हे चरित्रपट वेगळं काहीतरी देण्याचा ‘कमांडर’चा शिरस्ता कायम ठेवत अंकात समाविष्ट केले आहेत, त्याला नक्कीच वाचकांची पसंतीची पावती मिळेल.
भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी ह्यांचा जीवनपट उलगडणारा ‘आनंदी गोपाळ’, तसंच भारतातील पहिल्या महिला प्रॅक्टिसिंग डॉक्टर डॉ रखमाबाई राऊत ह्यांच्यावरील ‘डॉ रखमाबाई’, भारतात कुटुंबनियोजनाची चळवळ प्रथम राबवणाऱ्या र. धों कर्वे ह्यांचा जीवनपट ‘ध्यासपर्व’ या लेखांचा आवर्जून उल्लेख करायलाच हवा.
‘रझिया सुल्तान’, ‘संगीतसम्राट तानसेन’, ‘बैजू बावरा’, ‘मिर्झा गालिब’, ह्या क्लासिक्स आणि त्यांतील शास्त्रीय संगीताधारीत गीतांबद्दलचे लेख वाचकांची सिलोन रेडियो किंवा बिनाका गीतमालाच्या जमान्याची आठवण ताजी करतील. याशिवाय चरित्रपट का पहावे याचा ऊहापोह करणारा ‘प्रतिमांच्या मागावर’ हा लेख, काही न बनलेल्या चरित्रपटांबद्दल माहिती देणारा लेख, आणि ‘चरित्रात्मक चित्रपट’ ही विशेष कविता चोखंदळ प्रेक्षकांना नक्कीच भावेल.
*ठळक वैशिष्ट्यं*
कमांडर दिवाळी अंक चरित्रात्मक चित्रपट तथा Biopic विशेषांक – वर्ष 30
*संपादक*
डॉ. राजू पाटोदकर व प्रा. डॉ संजय पाटील देवळाणकर
*पृष्ठ संख्या* 192
*स्वागतमूल्य* 250 रुपये


