पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांना लहान वयातच स्वराज्य निर्माण करण्याची कल्पना मनामध्ये आली. यामागे राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे यांची शिकवण होती. त्यांच्या संस्कारामुळे शिवराय केवळ छत्रपती शिवाजी महाराज झाले नाहीत तर ते एक धीरूदत्त आणि आदर्शवत व्यक्ती झाले. त्यामुळेच ते हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार तरुण पिढी पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे , त्यांच्या मनावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे संस्कार होणे गरजेचे आहे तरच आपण बलशाली राष्ट्र निर्माण करू शकू, असा विश्वास श्रीराम जन्मभूमी न्यासाचे महासचिव प.पू. स्वामी गोविंददेव गिरी जी महाराज यांनी व्यक्त केले.
माहेश्वरी परिवार फाउंडेशन आणि समस्त माहेश्वरी समाज यांच्यातर्फे महालक्ष्मी लॉन्स येथे प. पू. स्वामी गोविंददेव गिरी जी महाराज यांचे ‘राजर्षी शिवछत्रपती स्फूर्ती गाथा’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी ते बोलत होते.
स्वामी गोविंददेव गिरी जी महाराज म्हणाले, हिंदूंचे बोळसट मन कायम त्यांचा नाश करत आले आहे. ज्यांच्यावर विश्वास टाकता कामा नये, त्यांच्यावर विश्वास टाकल्याने हिंदूंची राज्यच्या राज्य बुडाली. यातून हिंदूंनी धडा घेतला पाहिजे . या कपटातूनच शहाजीराजांना मुस्तफा खानाने धरले. परंतु या प्रसंगातून धडा घेत छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीही कपटी लोकांवर विश्वास ठेवला नाही आणि त्यामधून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. यामधून आपण प्रेरणा घेणे गरजेचे आहे.
शतकानुशतके हिंदू समाज भरडला जात होता. त्यामुळे या समाजातून स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची कल्पना सुद्धा कोणी करू शकेल अशी शक्यता त्या काळच्या राज्यकर्त्यांना वाटले नव्हते, परंतु राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे यांचे संस्कार इतके बळकट होते की त्यामधून छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालमन हे स्वराज्य निर्मितीकडे धावू लागले आणि त्यातूनच हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ज्याप्रमाणे स्वराज्य निर्मितीचे ध्येय लहानपणापासूनच कोरले गेले होते, त्याचप्रमाणे आजच्या तरुणांवर राष्ट्रनिर्मिती स्वप्न कोरले गेले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे दररोज आई भवानी माता व शिव लिंगाची पूजा करायचे, त्यामुळे ते एक पराक्रमी संतही होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


