क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे सायली घाडगे यांचा सत्कार – संदीप खर्डेकर.
साखळी चोरांना धैर्याने प्रतिकार करून पकडणाऱ्या सायली घाडगे चा आदर्श सर्वांनीच घ्यावा असे गौरवोदगार ना. मुरलीधर मोहोळ यांनी काढले.
सायली सारख्या तरुणी दुर्जानांविरुद्ध लढतात हे कौतुकास्पद असून हे स्त्री शक्तीचे प्रतीक आहे असेही ना. मुरलीधर मोहोळ म्हणाले.
याप्रसंगी सायली सह तिचे वडील प्रमोद घाडगे, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, नगरसेविका व क्रिएटिव्ह च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर, भरत मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
रविवारी रात्री १०:३० ते १०:४५ च्या दरम्यान सायली घाडगे ही तरुणी ब्ल्यू नाईल हॉटेल ते कॉन्सिल हॉल ह्या रस्त्यावरून पायी जात असताना दुचाकी वरून तिघे जण तिच्या जवळ आले व त्यातील एकाने तिच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला. सायली ने घाबरून न जाता त्याचा हात घट्ट धरून ठेवला व आरडाओरडा करायला सुरुवात केली,त्या चोरट्याने तिचे तोंड दाबले असता तिने त्याला लाथ घातली, दुचाकी वरील दोघांनी तिच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला मात्र सायलीने धाडसाने प्रतिकार केला व ती मदतीसाठी ओरडत राहिली. दरम्यान हा प्रकार पाहून काही नागरिक धावून आले व सायली ने त्यांच्या मदतीने तिघांना जेरबंद करून पोलिसांच्या स्वाधीन केले.
वास्तूविशारद ( आर्किटेक्ट ) असलेल्या अश्या ह्या शूर तरुणीचा सत्कार करताना क्रिएटिव्ह फाउंडेशन ला मनस्वी आनंद होतं आहे असे फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. येणाऱ्या काळात शालेय स्तरापासून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करून यासाठी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी पुढाकार घ्यावा आणि पहिल्या टप्प्यात मनपा च्या सर्व शाळांमध्ये हा स्व संरक्षणाचा उपक्रम राबवावा असे संदीप खर्डेकर म्हणाले.
या वेळी सायली घाडगे हीस शाल व शक्ती चे प्रतीक दुर्गा माता तसेच वीर हनुमानाची प्रतिमा भेट देण्यात आली.


