पुणे : सुशासकांची दोन मूर्तिमंत उदाहरणे महाराष्ट्राच्या मातीने जगाला दिली आहेत. ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्याबाई होळकर. स्वार्थ बाजूला ठेवून देव, देश आणि धर्म यांसाठी स्वतःला कसे समर्पित केले पाहिजे, हे त्यांनी दाखवून दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र इतके महान आहे की, त्यातून केवळ एक चांगला माणूसच नव्हे, तर राष्ट्रपुरुष घडवण्याची क्षमता आहे. बलशाली हिंदुस्थान घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रातील गुण प्रत्येकाने आपल्या अंगी बाळगले पाहिजेत, अशी भावना श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी व्यक्त केली.
माहेश्वरी परिवार फाउंडेशन आणि समस्त माहेश्वरी समाज, पुणे यांच्या वतीने प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या ‘राजर्षी शिवछत्रपती स्फूर्ती गाथा’ सोहळ्याचे आयोजन महालक्ष्मी लॉन्स येथे करण्यात आले होते. या सोहळ्याच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
प.पू. स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे महान व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रात जन्माला आले, हे आपले सौभाग्य आहे. अनेक प्रकारच्या विकारांनी बरबटलेले आपले मन धर्म, राष्ट्र आणि समाजाच्या सेवेसाठी अर्पण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुणांचे स्मरण केले पाहिजे.
हिंदुस्थानात कोणत्याही प्रकारे स्थिरता निर्माण होऊ नये आणि भारताचे तुकडे होऊन हा देश कमजोर व्हावा, अशी आशा मनात बाळगणाऱ्या अनेक शक्ती अस्तित्वात आहेत. अशा शक्तींसमोर आपण हतबल होऊ नये, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत निर्माण केलेल्या स्वराज्याची आपल्याला कायम आठवण राहिली पाहिजे. त्यांचे सर्वच गुण आपल्यामध्ये येणे शक्य नाही; परंतु त्यांचे स्मरण जरी केले, तरी त्यातून मिळणाऱ्या प्रेरणेच्या बळावर आपण अखंड हिंदुस्थान बलशाली करू शकतो, असा विश्वास प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी व्यक्त केला.
व्याख्यानापूर्वी कुसरो वाडिया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवगर्जना, शिववंदना आणि गारद सादर केली. कार्यक्रम स्थळी छत्रपती शिवाजी महाराज आणि प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांची चित्रे रांगोळीच्या स्वरूपात साकारणाऱ्या शारदा अवसरे यांचा देखील सत्कार करण्यात आला. प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या व्याख्यानानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकावर आधारित कार्यक्रम झाला.


