Thursday, November 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुनवडी ते पुणे प्रवासाचा मागोवा घेणारा 'पुनवडी महोत्सव' १० जानेवारीपासून ...

पुनवडी ते पुणे प्रवासाचा मागोवा घेणारा ‘पुनवडी महोत्सव’ १० जानेवारीपासून सिंहगड रस्त्यावर रंगणार सांस्कृतिक सोहळा

 

 

पुणे, दि. १९:पुण्याचे प्राचीन नाव असलेल्या ‘पुनवडी’पासून ते आजच्या आधुनिक आणि ऐतिहासिक पुणापर्यंतचा प्रवास अनुभवायला मिळणारा भव्य ‘पुनवडी महोत्सव २०२६’ आगामी १० जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे कलाग्राम येथे आयोजित करण्यात आला आहे. सदैव फाउंडेशन आणि हनुमान मित्र मंडळ (कसबा पेठ) यांच्या संयुक्त विद्यमाने हा सांस्कृतिक सोहळा होत असून, ‘ऐतिहासिक वारसा, आधुनिकतेचा ध्यास’ हे ब्रीदवाक्य डोळ्यांसमोर ठेवून पुणेकरांच्या ऐतिहासिक आणि साहित्यिक वारशाला उजाळा देणारा हा एक अनोखा अनुभव असणार आहे. पु. ल. देशपांडे कलाग्राम येथे आयोजित पत्रकार परिषदे सदैव फाऊंडेशनचे विश्वस्त आणि पुनवडी महोत्सव प्रमुख संयोजक अनिरुद्ध येवले यांनी दिली.

 

या पत्रकार परिषदेसाठी ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी, आर्यन्स वर्ल्ड स्कूलचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद लडगे, राष्ट्रीय कीर्तनकार प्रा. डॉ. चारुदत्त आफळे, आध्यात्मिक गुरु डॉ. संजय उपाध्ये, माजी आमदार उल्हासदादा पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई आणि हॅप्पीनेस कोच मकरंद टिल्लू उपस्थित होते. तसेच चित्रकार व शिल्पकार दाम्पत्य शरदचंद्र व सुचिता तरडे, ग्राहक पेठचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, आयटी तज्ज्ञ डॉ. दिपक शिकारपूर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे आणि ज्येष्ठ पत्रकार व इतिहास अभ्यासक आनंद सराफ यांचीही प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक प्रा. विलास कथुरे , सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोहिते, वंचित विकास संस्थेच्या कार्यवाह मीनाताई कुर्लेकर, आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप, साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियुष शहा, अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू शांताराम जाधव आणि प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक विजय पटवर्धन व क्षितीश दाते हे मान्यवर देखील याप्रसंगी हजर होते.

 

 

 

अनिरुद्ध येवले यांनी प्रस्ताविकेमध्ये गणेशोत्सवातील कार्यकर्त्यांच्या कल्पकतेला व्यावसायिक स्वरूप देण्याच्या उद्देशाने ‘पुनवडी ते पुणे महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. आठ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात साडेचार एकर परिसरात जुन्या पुण्याची प्रतिकृती उभारण्यात येणार असून, कला, संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडणार आहे. विविध संस्था, कंपन्या आणि मान्यवरांच्या सहभागातून महोत्सवाची कोअर कमिटी स्थापन करण्यात आली आहे. दरवर्षी हा लोकउत्सव आयोजित करण्याचा आयोजकांचा मानस आहे.

 

 

उल्हास पवार म्हणाले, पुण्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि कलात्मक वैभव नव्या पिढीसमोर आणण्यासाठी साडेचार एकरांत ‘जुनं पुणं’ उभारण्यात येणार आहे. या उपक्रमातून जुन्या पुण्याची जीवनशैली, कला, उत्सव आणि सामाजिक वातावरण अनुभवता येणार असून, लाखो नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी.

 

 

शरदचंद्र तरडे म्हणाले, पुण्याच्या सांस्कृतिक आणि कलात्मक परंपरेची मुळे अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत. या उपक्रमात प्रत्येक पुणेकराचा सहभाग महत्त्वाचा असून, नव्या पिढीला या कार्याचे फलित अनुभवता येईल.

 

 

मकरंद टिल्लू म्हणाले, हसरे पुणे घडविण्यासाठी कार्यरत नवचैतन्य हास्य परिवाराच्या २५० हास्य क्लबमधील शेकडो सदस्य पुनवडी महोत्सवाच्या उद्घाटनाला हास्ययोग सादर करणार आहेत. परिवाराचे सध्या २५ हजार सदस्य असून, पुढील वर्षी ३० व्या वर्धापनदिनानिमित्त पुण्यात एक लाख नागरिकांना जोडण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती देण्यात आली.

 

 

डॉ. दीपक शिकारपूरकर म्हणाले, महोत्सवात पुण्याच्या संशोधन आणि तंत्रज्ञानाचा स्वतंत्र एआय दालनातून परिचय करून देण्याची सूचना त्यांनी केली.

 

पराग ठाकूर म्हणाले, पुनवडी महोत्सवासाठी आर्यन वर्ल्ड स्कूलतर्फे नाटक, ढोल-ताशा, तलवारबाजी, भालाफेक, कबड्डी आणि खो-खोचे सादरीकरण करण्यात येणार आहे. सुमारे दहा हजार विद्यार्थी आणि ३०० हून अधिक कलाकारांचा सहभाग देण्याची तयारी असल्याचे सांगितले. तसेच ‘शार्पनर’ डिजिटल चॅनेलच्या माध्यमातूनही महोत्सवाला सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले.

 

 

मिलिंद भोई म्हणाले, तरुणाईला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचविण्यासाठी पुनवडी महोत्सवात विशेष दालन उभारण्याची सूचना आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाच्या सहकार्याने चित्रपट, पोस्टर्स आणि रिल्सद्वारे जनजागृती केली जाणार आहे.

 

महेश सूर्यवंशी म्हणाले, गणेशोत्सवातील कार्यकर्त्यांच्या कल्पकतेला व्यावसायिक स्वरूप देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे काम ‘पुनवडी महोत्सवा’तून होणार आहे. कार्यकर्त्यांच्या कौशल्यांना व्यासपीठ मिळाल्यास आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

 

सूर्यकांत पाठक म्हणाले, पुण्यातील पारंपरिक वाण्याच्या दुकानापासून डिपार्टमेंटल स्टोअरपर्यंतचा प्रवास ‘पुनवडी महोत्सवा’तून उलगडणार आहे. मंडईतील पहिले डिपार्टमेंटल स्टोअर, पारिजात आणि स्वदेशी ग्राहक पेठेची माहिती प्रदर्शनातून दिली जाणार आहे. ग्राहक प्रबोधन आणि स्वदेशी व्यापार संस्कृतीचा इतिहास नव्या पिढीला अनुभवता येणार आहे.

 

शांताराम जाधव म्हणाले, मातीवरील कबड्डीपासून मॅटवरील आधुनिक खेळापर्यंतचा प्रवास ‘पुनवडी महोत्सवा’तून मांडण्यात येणार आहे. पुण्यातून देशभर विस्तारलेली कबड्डी आज ३५ देशांत खेळली जाते. कबड्डी, खो-खो आणि कुस्ती या देशी खेळांचा इतिहास, खेळाडूंचे योगदान आणि क्रीडा संस्कृतीचे दर्शन प्रदर्शनातून घडणार आहे.

 

 

 

चौकट:

खाद्यसंस्कृतीची मेजवानी

 

महोत्सवात दररोज एका वेगळ्या थीमवर खाद्य महोत्सव रंगणार आहे. यामध्ये पेशवाई भोजन, ग्रामीण महाराष्ट्र पारंपरिक भोजन, पुणेरी स्ट्रीट फूड, आंतरराष्ट्रीय पारंपरिक खाद्य, हेल्दी फूड, स्टार्टअप फूड, महिला बचतगटांचे पदार्थ आणि पुणेरी फूड कार्निव्हल यांचा समावेश असेल. तसेच लाइव्ह पुरणपोळी, मोदक, ‘आजीच्या हातची चव’ स्पर्धा आणि मिसळ चॅलेंज ही विशेष आकर्षणे ठरतील.

 

——-

चौकट:

कला व संस्कृती विभाग

 

वारसा आणि लोककले अंतर्गत पेशवाई दरबार अनुभव, शिवकालीन मावळे, स्वातंत्र्य वीर गॅलरी, मंगळागौरीचे खेळ, भारुड, पोवाडा, गोंधळ आणि सवाल-जवाब लावणी सादरीकरण होईल. याशिवाय व्हर्च्युअल रिॲलिटी द्वारे शनिवारवाडा आणि एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुण्याचा इतिहास अनुभवता येणार आहे.

 

———

चौकट:

आधुनिक व पारंपरिक कला

 

वारली चित्रकला, पैठणी विणकाम, तांबट आळी हस्तकला यांसारख्या पारंपरिक कलांसोबतच एआय आर्ट गॅलरी, डिजिटल पेंटिंग आणि थ्रीडी इन्स्टॉलेशन यांसारखे आधुनिक आविष्कार पाहायला मिळतील. पुणेकरांच्या जगण्याचा श्वास असलेल्या सण-उत्सव, इतिहास आणि कलेचा हा संगम अनुभवण्यासाठी नागरिकांनी व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments