पुणे, दि. १९ : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या मेरा युवा भारत (MY Bharat), पुणे यांच्या वतीने डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, पुणे येथे ‘विकसित भारत युवा संसद २०२७’ या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. तरुणांच्या विचारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि राष्ट्रनिर्माणात त्यांचा सक्रिय सहभाग वाढावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. प्रसाद जोशी उपस्थित होते. त्यांनी तरुणांना मार्गदर्शन करताना देशाच्या विकासात युवा शक्तीचे असलेले योगदान आणि नेतृत्वगुणांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा युवा अधिकारी आशिष संजय शेटे यांनी केले. त्यांनी ‘मेरा युवा भारत’ पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत या स्पर्धेची पार्श्वभूमी स्पष्ट केली.
या स्पर्धेसाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यामध्ये प्रसिद्ध कवी व व्याख्याते विजय लोंढे, टीच फॉर इंडियाच्या कम्युनिटी डेव्हलपर व माय भारत युथ आयकॉन अनुष्का बॅनर्जी, तसेच सामाजिक कार्यकर्त्या व शांतीदूत आम्रपाली चव्हाण यांचा समावेश होता. परीक्षकांनी स्पर्धकांचे विषयज्ञान, विचारांची मांडणी, आत्मविश्वास आणि वक्तृत्व शैली या निकषांवर सखोल परीक्षण केले.
अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेतून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन स्पर्धकांची राज्यस्तरीय फेरीसाठी निवड करण्यात आली आहे
प्रथम क्रमांक: आशुतोष राकेश सिंग (Ashutosh Rakesh Singh)
द्वितीय क्रमांक: कस्तुरी महेश गायकवाड (Kasturi Mahesh Gaikwad)
तृतीय क्रमांक: नंदिनी गुप्ता (Nandini Gupta)
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील शिंदे यांनी केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी ‘माय भारत, पुणे’चे लेखा व कार्यक्रम सहायक मंगेश दुबे यांनी उपस्थित मान्यवर, परीक्षक, डेक्कन कॉलेज प्रशासन आणि सर्व स्पर्धकांचे मनःपूर्वक आभार मानले.


