प्रतिनिधी
पिंपरीः एक संघर्षमय प्रवास… एका मातेची जिद्द… कुटुंबासाठी केलेला त्याग आणि दोन मुलांच्या यशस्वी वाटचालीचा अभिमानास्पद इतिहास! असा जीवनप्रवास असलेल्या कै. वंदना शैलेंद्रसिंह परदेशी यांचे नुकतेच निधन झाले.त्यांच्या पश्चात मोठे पुत्र दीपेशसिंह परदेशी, मोठी सून रोशनी परदेशी, लहान पुत्र अतुलसिंह परदेशी, सून अश्विनी परदेशी तसेच नातू सिद्धेशसिंह परदेशी, विराजसिंह परदेशी आणि जान्हवी परदेशी व माही परदेशी असा त्यांचा परिवार आहे.त्यांचा दशक्रियाविधी २५ नोव्हेंबर २०२६ रोजी बुधवारी जु्न्रर येथील कुकडी नदी तीरावर सकाळी साडेसात वाजता होणार आहे.त्यानिमित्त प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक गणेश शिंदे यांचे प्रवचन होईल.दरम्यान,नातेवाईकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि हितचिंतकांनी कै.वंदना परदेशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत परदेशी कुटुंबाचे सांत्वन केले आहे.
कै. वंदना परदेशी यांचा जन्म ११ डिसेंबर १९६१ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात झाला होता.सोप्या, सरळ स्वभावाच्या, धार्मिक वृत्तीच्या आणि सामाजिक कार्याची आवड असलेल्या वंदनाताईंनी आपल्या आयुष्यात कुटुंब, समाज आणि माणुसकी यांना नेहमीच प्राधान्य दिले.त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून काम पाहिले. भजनी मंडळामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. विविध देवदर्शन यात्रांमध्ये त्या उत्साहाने सहभागी होत असत. धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा. तसेच मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्सच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले.
२००२ – सोयगाव ते शिवजन्मभूमी जुन्नर
सन २००२ हे त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वर्ष ठरले. आपल्या दोन मुलांना सोबत घेऊन त्यांनी सोयगाव येथून पुणे जिल्ह्यातील छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर नगरीकडे आपला प्रवास सुरू केला.जुन्नर शहरात आल्यानंतर मावशी सुमित्रा परदेशी आणि अजित काका परदेशी यांच्या आधाराने त्यांनी आपल्या परिवाराच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली.नवीन शहर, नवीन माणसे, मर्यादित साधनसामग्री आणि डोळ्यांसमोर दोन मुलांचे भविष्य… अशा परिस्थितीत त्यांनी कधीही हार मानली नाही.कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दोन्ही मुलांनी विविध छोटे-मोठे व्यवसाय केले. प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर या परिवाराने जुन्नरच्या मातीत आपले वेगळे स्थान निर्माण केले.
मोठ्या मुलाची राजकीय वाटचाल
त्यांचे मोठे पुत्र दीपेशसिंह परदेशी यांनी जुन्नर नगरीच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली.सन २०१७ मध्ये जुन्नर नगरपरिषदेच्या निवडणुकीत ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना पाणीपुरवठा सभापती, गटनेते आणि पुढे उपनगराध्यक्ष अशा महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या दिल्या. आजही ते जुन्नर नगरीमध्ये सामाजिक कार्याच्या माध्यमातून सक्रिय आहेत.
लहान मुलाचा पत्रकारितेतील प्रवास
दुसरे पुत्र अतुलसिंह परदेशी यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.गेल्या २२ वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी १२ वर्षे प्रिंट मीडियामध्ये काम केले. त्यानंतर स्वतःचे ‘आपला आवाज न्यूज नेटवर्क’ सुरू करून गेली १२ वर्षे सकारात्मक आणि लोकाभिमुख पत्रकारितेचा प्रवास सुरू ठेवला आहे.त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाची दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष, इलेक्ट्रॉनिक मीडिया, महाराष्ट्र राज्य ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.आज औद्योगिक नगरी पिंपरी-चिंचवड येथून ते ‘आपला आवाज न्यूज नेटवर्क’च्या माध्यमातून जनतेचा आवाज बुलंद करण्याचे काम करीत आहेत.
दोन मुलांच्या यशात पाहिले आयुष्याचे सार्थक
एका आईसाठी आपल्या मुलांचे यश, त्यांची प्रगती आणि त्यांनी समाजात मिळवलेला सन्मान यापेक्षा मोठा आनंद कोणता असू शकतो?ज्या दोन मुलांना सोबत घेऊन त्यांनी २००२ मध्ये सोयगावहून जुन्नरचा प्रवास सुरू केला, त्याच मुलांनी आपल्या कष्टातून, जिद्दीने आणि मेहनतीने स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. एक मुलगा जुन्नरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात, तर दुसरा मुलगा पुणे जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रात आपले योगदान देत आहे. दोन्ही मुलांची ही यशस्वी वाटचाल पाहणे, हाच वंदनाताईंच्या आयुष्यातील सर्वांत मोठा आनंद आणि अभिमान होता.
सोयगावच्या मातीत जन्म घेऊन जुन्नरच्या शिवजन्मभूमीत आपल्या कुटुंबाचा संसार उभा करणाऱ्या या मातेने आपल्या कष्टाने, संस्काराने आणि त्यागाने पुढील पिढीला एक भक्कम आधार दिला.आज त्या आपल्यात नाहीत. मात्र त्यांनी दिलेले संस्कार, त्यांनी केलेला संघर्ष, त्यांनी जोडलेली माणसे आणि आपल्या मुलांच्या रूपाने उभे केलेले कर्तृत्व कायम स्मरणात राहील.
॥ ॐ शांती ॥
—————-


