*राजगड, भोर आणि मुळशी तालुक्यांतील ३९ ग्रामपंचायतींचा सामूहिक पाठिंबा; आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था, पर्यटन आणि शेतीमालाच्या बाजारपेठांना चालना*
पुणे, दि. २३ : ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२७’च्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेला सामूहिक पाठिंबा मिळत आहे. राजगड (वेल्हे), भोर आणि मुळशी तालुक्यांतील एकूण ३९ ग्रामपंचायतींची आभारपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहेत. उपलब्ध यादीत राजगड तालुक्यातील १६, भोरमधील ७ आणि मुळशीतील १६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या पाठिंब्यामागे स्पर्धेचे स्वागत करण्याबरोबरच ग्रामीण भागाच्या विकासातून निर्माण होणाऱ्या नव्या संधींबद्दल लोकांमध्ये उत्साह आहे.
२६ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत होणाऱ्या पुणे ग्रँड टूरच्या दुसऱ्या पर्वामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग आंतरराष्ट्रीय सायकलिंगच्या नकाशावर पुन्हा झळकणार आहे. पहिल्या पर्वानंतर स्पर्धेला आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघाची (UCI) २.१ श्रेणी मिळाली आहे. जगभरातील व्यावसायिक सायकलपटू जिल्ह्यातील रस्त्यांवरून मार्गक्रमण करणार असल्याने या परिसरातील रस्ते, निसर्ग, वारसा आणि ग्रामीण जीवनशैलीला जागतिक स्तरावर मान्यता मिळणार आहे.
स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय मानकानुसार विकसित आणि दर्जोन्नत करण्यात आलेल्या रस्त्यांचा लाभ स्पर्धेच्या दिवसांपुरता मर्यादित राहणार नाही. गावांना शहरांशी जोडणारी वाहतूक अधिक सुलभ झाल्याने शेतमाल बाजारपेठांपर्यंत पोहोचवणे, स्थानिक उत्पादने ग्राहकांपर्यंत नेणे आणि ग्रामीण भागातील व्यवसायांना व्यापक बाजारपेठ मिळवून देणे शक्य होईल. सुधारित रस्ते दळणवळणाचा हा पाया स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देणारा ठरू शकतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने आणि दैदीप्यमान कारकिर्दीने पुनीत झालेला राजगडचा ऐतिहासिक वारसा, सह्याद्रीचे निसर्गसौंदर्य आणि ग्रामीण संस्कृती स्पर्धेच्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. यामुळे या भागाविषयी पर्यटनाची उत्सुकता वाढण्यास आणि स्थानिक पर्यटन, निवास, खाद्यपदार्थ, मार्गदर्शन तसेच इतर सेवांशी संबंधित व्यवसायांना नव्या संधी मिळण्यास मदत होईल. कृषिपूरक व्यवसाय आणि स्थानिक उत्पादनांची ओळख वाढवण्याची संधीही निर्माण होऊ शकते.
ग्रामपंचायतींच्या आभारपत्रांमधून रस्त्यांच्या सुधारणेचा आणि स्पर्धेमुळे मिळणाऱ्या प्रसिद्धीचा लाभ गावांपर्यंत पोहोचावा, ही सामूहिक अपेक्षा व्यक्त झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकप्रतिनिधी यांचा हा पाठिंबा पुणे ग्रँड टूरला अधिक व्यापक स्वरूप देत आहे.
भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर हरमण मांडेकर यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठवून या उपक्रमाचे कौतुक केले आहे. स्पर्धेमुळे पायाभूत सुविधांचा विकास, पर्यटनवृद्धी आणि स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण जगदाळे यांनीदेखील या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासन स्पर्धेच्या आयोजनाची तयारी करत आहे. ग्रामपंचायती, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांकडून मिळणारा सामूहिक प्रतिसाद हा पुणे ग्रँड टूरचे लाभ ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.


