पुणे, २४ नोव्हेंबर २०२६ : माणुसकी आणि निःस्वार्थ भावनेचे प्रेरणादायी उदाहरण देत पुण्यातील एका ३९ वर्षीय गृहिणीच्या कुटुंबीयांनी तिला मेंदूमृत घोषित केल्यानंतर अवयवदानाचा निर्णय घेतला. मेंदूत रक्तस्राव झाल्यानंतर त्यांना मेंदूमृत घोषित करण्यात आले होते. अशा दुःखद प्रसंगातही कुटुंबीयांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे तीन रुग्णांना नवजीवन मिळाले आहे.
या महिलेला ११ नोव्हेंबर २०२६ रोजी उपचारांसाठी नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर येथे दाखल करण्यात आले होते. १५ नोव्हेंबर रोजी त्यांना मेंदूमृत घोषित करण्यात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी अवयवदानास संमती दिली आणि आपल्या वैयक्तिक दुःखाचे रूपांतर इतरांसाठी आशेच्या किरणात केले.
१६ नोव्हेंबर रोजी अवयव काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेत दात्याचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंडे यशस्वीरीत्या काढण्यात आली. यकृत आणि एक मूत्रपिंड नोबल हॉस्पिटल्समध्ये प्रत्यारोपित करण्यात आले, तर दुसरे मूत्रपिंड झेडटीसीसीने नाशिक येथील एका रुग्णालयाला दिले अशी माहिती नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरचे समूह कार्यकारी अधिकारी डॉ.संजय पठारे यांनी दिली.
नोबल हॉस्पिटल्समध्ये यकृताचे प्रत्यारोपण दीर्घकालीन यकृतविकाराने ग्रस्त असलेल्या ४१ वर्षीय पुरुष रुग्णावर करण्यात आले, तर मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण मूत्रपिंड निकामी झालेल्या ४० वर्षीय पुरुष रुग्णावर करण्यात आले.
या प्रत्यारोपण प्रक्रियेत यकृत प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ.मनोज श्रीवास्तव आणि डॉ.स्मिता पारख, भूलतज्ज्ञ डॉ. श्रीकांत कोटे, मूत्रपिंड प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. शशिकांत भांगे तसेच वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते आणि प्रत्यारोपण समन्वयक महेश तुपे यांचा समावेश होता. नोबल हॉस्पिटल येथील समन्वयन वैद्यकीय संचालिका डॉ.मनिषा पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरचे उपव्यवस्थापकीय संचालक डॉ. दिविज माने म्हणाले, “प्रत्येक अवयवदान ही करुणा, धैर्य आणि आशेची कहाणी असते. स्वतःच्या आयुष्यातील अत्यंत दुःखद प्रसंगाला सामोरे जात असतानाही या महिलेच्या कुटुंबीयांनी स्वतःच्या दुःखापलीकडे जाऊन इतरांचे प्राण वाचविण्याचा निर्णय घेतला. या जीवनदायी प्रक्रियेचे योग्य समन्वयाने यशस्वी आयोजन केल्याबद्दल झेडटीसीसी पुणे आणि सहभागी सर्व वैद्यकीय पथकांचेही आम्ही आभा
र मानतो.”


