पुणे, २५ नोव्हेंबर २०२६: पूना रिजन ब्रिज असोसिएशन आणि महाराष्ट्र ब्रिज असोसिएशन यांच्या वतीने आयोजित अशोक वैद्य मेमोरियल अखिल भारतीय ब्रिज स्पर्धेत सांघिक गटात एके सिन्हाज ४ संघाने सोलानी संघाचा ३९ गुणांनी पराभव करत विजेतेपद संपादन केले.
पीवायसी हॉल येथे पार पडलेल्या या स्पर्धेत सांघिक गटाच्या अंतिम लढतीत एके सिन्हा, सत्यव्रत मुखर्जी, मीनल ठाकूर आणि कौशिक मुखर्जी यांचा समावेश असलेल्या एके सिन्हाज ४ संघाने जितू सोलानी, आनंद शहा, मिलिंद आठवले, अजय खरे यांचा समावेश असलेल्या सोलानी संघावर ३९ गुणांनी मात केली.
अन्य महत्वाच्या लढतीत फॉर्मीडेबल्स संघाने एसडी असोसिएट्स संघाचा ११ गुणांनी पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला. कौस्तुभ बेंद्रे, कौस्तुभ नंदी, संदीप ठकराल आणि राजेश्वरी तिवारी यांचा समावेश होता. तर एसडी असोसिएट्समध्ये केशव सामंत, विजय फातरफेकर, आर श्रीधरन, सुबीर मुजुमदार, इयान कांसेसीयो व सुभाष भवनानी या खेळाडूंचा समावेश होता.
मॅच पॉईंट ओपन पेअर्स गटात पुण्याच्या संपत श्रीनिवासन आणि नितीन शिरोळे या जोडीने ६१८.७१ गुणांसह विजेतेपदाचा मान पटकावला. तर, आदिती झवेरी व विश्वजित पोद्दार या जोडीने ६०१.५६ गुणांची कमाई करताना दुसरा क्रमांक पटकावला. अनिरुद्ध झंजगिरी व रंगा खडलोया या जोडीने तिसरे, तर अनिल पाध्ये व कैझाद अंकलेसरिया या जोडीने चौथे स्थान मिळवले. या स्पर्धेत एकूण ६० जोड्या सहभागी झाल्या होत्या त्यातील २४ जोडयांनी मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला होता.
आयएमपी पेअर्स गटात भास्कर पेंडसे व राजू खरे या जोडीने ९१ गुणांची कमाई करत विजेतेपदाला गवसणी घातली. अजय सोनक व हेमंत पुरकर या जोडीने ७७ गुणांसह दुसरा, सोहम सरकार व अविजीत सरकार या जोडीने ७५.०६ गुणांसह तिसरा क्रमांक निश्चित केला.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदू जिमखानाचे सचिव दिपक गाडगीळ, बीएफआयचे उपाध्यक्ष आनंद सामंत, एमबीएचे उपाध्यक्ष डॉ. अविनाश देशमुख, पीआरबीएचे अध्यक्ष मिलिंद भडभडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा संयोजन सचिव सचिन कानगो यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
केले.


