Thursday, November 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचे*  *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण*

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचे*  *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण*

 

*मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल*

– *पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे*

 

मुंबई, दि. २६ : ग्रामीण भागातील युवकांना स्वयंरोजगारापुरते मर्यादित न ठेवता पशुधन क्षेत्रातील उद्योजक बनविण्यासाठी ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ आजपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. ग्रामीण युवकांच्या प्रयत्नांना शासनाच्या आर्थिक मदतीची जोड देऊन पशुधन क्षेत्रातील उद्योजकांची नवी पिढी घडविण्यात येईल. ही योजना ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा बदलणारी ठरेल, असा विश्वास पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पशुसंवर्धन विभागाने चांगले काम केल्याबद्दल पशुसंवर्धन विभागाचे अभिनंदन केले.

 

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसह राज्य शासनाच्या विविध विभागांच्या १७४ सेवा व प्रकल्पांचे लोकार्पण झाले. त्यावेळी पशुसंवर्धन मंत्री मुंडे बोलत होत्या. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव तसेच समग्र आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, राज्य शासन विविध योजनांचे लाभ थेट लाभ हस्तांतरणाद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवत आहे. या लाभांसोबतच नागरिकांची कार्यक्षमता, स्वावलंबन आणि स्वतःच्या कर्तृत्वावर प्रगती करण्याची इच्छा कायम राहणे आवश्यक आहे. ग्रामीण युवकांनी रोजगार मागण्याऐवजी स्वयंरोजगार निर्माण करावा आणि उद्योजक म्हणून पुढे यावे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

 

पशुसंवर्धन विभागाने योजनेचे सादरीकरण केल्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पहिल्याच अर्थसंकल्पात या योजनेसाठी तरतूद केली. विभागाने महाआयटीच्या सहकार्याने योजनेसाठी आवश्यक ऑनलाइन प्रणाली विकसित करून तिच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत. अर्जापासून लाभ वितरणापर्यंतची प्रक्रिया ऑनलाइन आणि पारदर्शक राहणार आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावरील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे योजनेच्या प्रक्रियेला काही काळ स्थगिती देण्यात आली होती. आता योजनेचा प्रारंभ झाला असून प्रत्येक जिल्ह्यासाठी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ऑनलाइन अर्जांमधून प्राप्त होणाऱ्या प्रतिसादाच्या आधारे पशुधन व्यवसायाचे समूह कोणत्या भागांत उभारता येतील, याचे नियोजन विभाग करणार आहे. हा योजनेच्या पुढील टप्प्याचा भाग असेल, असे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

 

या योजनेत ५० टक्के अनुदानाची तरतूद असून महिला तसेच अनुसूचित जाती-जमातीतील लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदान मिळेल. दूध, अंडी, कुक्कुटपालन, मांस उत्पादन आणि वराहपालन या क्षेत्रांत पशुधन व्यवसायाचे समूह विकसित करण्यावर विभाग भर देणार आहे. आदिवासी भागांत वराहपालन व्यवसायाला मोठी संधी असून स्थानिक युवकांना त्याद्वारे उद्योजकतेकडे वळवता येईल. पशुधन उत्पादनाच्या विविध क्षेत्रांत महाराष्ट्राला देशात आघाडीचे राज्य बनविण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

लाभार्थ्यांनी स्वतः प्रयत्न करून व्यवसाय उभारावा आणि उत्पन्नाचे शाश्वत साधन निर्माण करावे, अशी या योजनेची रचना आहे. तरुण पिढीला केवळ अनुदान देण्याऐवजी त्यांना स्वतःची उपजीविका उभारण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. ग्रामीण युवकांच्या प्रयत्नांना शासनाच्या आर्थिक मदतीची जोड देऊन पशुधन क्षेत्रातील उद्योजकांची नवी पिढी घडविण्यात येईल, असे मंत्री मुंडे म्हणाल्या.

 

अर्जासाठी फार्मर आयडी अनिवार्य नसून महाआयडी आवश्यक आहे. अर्जदारांची आवश्यक माहिती स्वयंचलितरीत्या प्राप्त करण्याचे नियोजन विभागाने केले आहे. त्यामुळे अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ होऊन योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता राखता येणार आहे. लोकप्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत प्राप्त सूचनांचा योजनेच्या अंमलबजावणीत विचार करण्यात येत आहे. आकांक्षित तालुक्यांना अधिक प्रोत्साहन द्यावे आणि तेथे निश्चित उद्दिष्टाचे बंधन ठेवू नये, अशी सूचना मंत्री मुंडे यांनी यावेळी केली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments