पुणे : कसबा पेठेतील प्राचीन गामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात अक्षय्यतृतीयेनिमित्त आंब्यांची सजावट करण्यात आली. श्री काळभैरवाला तब्बल ५०१ आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला होता. तसेच विविध प्रकारच्या फुलांची आकर्षक आरास देखील मंदिरात करण्यात आली.
श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळ भैरवनाथ मंदिर तर्फे कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवातील फळे विविध सामाजिक संस्थांना देण्यात येणार आहेत.
श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत असून भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. त्यामुळे मंदिर गाभा-यापासून ते प्रवेशद्वारापर्यंत आंब्यांची आकर्षक सजावट करण्यात आली. तसेच मंदिराला आमराईचे रुप देण्यात आले होते. मंदिराचे व्यवस्थापन आजपर्यंत लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात.
कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूर्वीची पुण्यातील वस्ती. याठिकाणी मुल:, मुक्ता आणि नाग या तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे. गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. अशा कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात आयोजित आंबा महोत्सव पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली.


