शिवजयंती महोत्सव समितीचा सलग १२ वर्षे अभिनव उपक्रम : शिवराज्याभिषेक तथा सार्वजनिक शिवस्वराज्य दिनानिमित्त आयोजन
पुणे : शिवरायांनी स्वत:चा शक म्हणजेच शिवशक प्रारंभ करुन राजदंड हाती घेत सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करुन स्वराज्याचा सार्वभौम पवित्र सुवर्ण कलश रयतेच्या झोळी मध्ये रिता करुन रयतेची झोळी सुखसमृध्दी, स्वातंत्र्य, समानतेने भरली. त्यामुळे शिवराज्याभिषेक तथा शिवस्वराज्य दिनानिमित्त गुरुवार, दिनांक ६ जून रोजी सकाळी १० वाजता शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस येथील जगातील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारुढ स्मारक व शिवराज्याभिषेक शिल्पा समोर भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात येणार आहे. यावेळी शिवकालीन ऐतिहासिक सर्व स्वराज्यघराणी, स्वराज्यबांधव व महिलावर्ग उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती शिवस्वराज्य दिन सोहळ्याचे प्रवर्तक व शिवजयंती महोत्सव समितीचे आद्यप्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.
पुण्यामध्ये दरवर्षी लालमहाल, एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, छत्रपती संभाजी महाराज स्मारक डेक्कन, शनिवारवाडा यांसह अनेक ठिकाणी स्वराज्यगुढी उभारली जाते. यावर्षी देखील एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे स्वराज्यगुढी उभारुन पूजन होणार आहे.
समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, तुळशीबाग मंडळ, सेवा मित्र मंडळ, साईनाथ मंडळ, लक्ष्मीबाई दत्त मंदिर यासह ३६० गणेशोत्सव मंडळे तसेच शिवकालीन सरदारांच्या वंशजांकडून शिवनेरी, राजगड, तोरणा, पुरंदर, सिंहगड, संग्रामदुर्ग यांसह असंख्य किल्ल्यावर शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारुन शिवस्वराज्य दिन… शिवराज्याभिषेक दिन… साजरा करणार आहेत.
अमित गायकवाड म्हणाले, शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच ६ जून १६७४ हा दिवस भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा अतिशय महत्वाचा दिवस आहे. त्यामुळेच ६ जून शिवस्वराज्यदिन विश्वव्यापी होण्यासाठी आम्ही ६ जून २०१३ सालापासून भगव्या स्वराज्यध्वजा सह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी प्रत्येक गडावर, घरावर, चौकात, गावात, तालुक्यात, शहरात, जिल्ह्यात, राज्यात तसेच देशविदेशात उभारुन साजरा करत आहोत. शिवरायांचा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, वाघनखे, शिवमुद्रा या पंचशुभ चिन्हांनी अलंकृत भगवा स्वराज्यध्वज निर्माण करण्यात आला आहे. यावर्षी देखील विविध ठिकाणी स्वराज्यध्वज व स्वराज्यगुढी उभारुन शिवराज्याभिषेक दिन तथा शिवस्वराज्य दिन साजरा होणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन सोहळयाचे प्रवर्तक अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, समीर जाधवराव, निलेश जेधे, शंकर कडू, किरण साळी, किरण देसाई, प्रवीण गायकवाड, गोपी पवार, सागर पवार,मोहन पासलकर, किरण शितोळे, मयुरेश दळवी यांसह असंख्य स्वराज बांधवांनी केले आहे.
तरी वरील बातमीस आपल्या सुप्रसिद्ध दैनिक/ वृत्तवाहिनीवर प्रसिद्धी द्यावी. तसेच कार्यक्रमाला आपला बातमीदार व छायाचित्रकार पाठवावा, ही नम्र विनंती.


