पुणे, ४ जून २०२४ : भारतातील एकमेव आयएसओ प्रमाणित आयटी ट्रेड असोसिएशन असलेल्या कॉम्प्युटर्स अॅन्ड मीडिया डीलर्स असोसिएशन,पुणे (सीएमडीए) तर्फे शिवाजी नगर येथील भारत इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः कार्यरत आयटी लॅब सुरु करण्यात आली आहे. या सीएमडीए आयटी लॅबच्या उद्घाटन प्रसंगी विद्या प्रसारिणी सभेच्या अध्यक्ष डॉ. मृणालिनी गरवारे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वर्षा क्षीरसागर, सीएमडीए पुणेचे अध्यक्ष शामसुंदर भंडारी, उपाध्यक्ष व खजिनदार कौसर दाभिया, संपूर्ण सीएमडीए समिती आणि शाळा कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे सामाजिक उपक्रमांतर्गत सीएमडीए तर्फे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या शाळा,विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या संस्था आणि आर्थिकदृष्ट्या वंचित वर्गातील विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या शाळांना आयटी उपकरणे प्रदान करण्यात येतात.
याप्रसंगी बोलताना सीएमडीएचे उपाध्यक्ष व खजिनदार कौसर दाभिया म्हणाले की, सीएमडीए पुणे हा सामाजिक उपक्रम शाश्वतरित्या सुरु ठेवण्यास उत्सुक असून राष्ट्र उभारणीच्या मार्गात योगदान दिल्याचा आम्हाला अभिमान आहे.
आपल्या जीवनातील प्रत्येक पैलू आता डिजिटल पद्धतीने जोडला गेला असल्याने आजच्या काळात, संगणक साक्षर होणे ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
सीएमडीए पुणेचे अध्यक्ष शामसुंदर भंडारी यांनी विद्यार्थ्यांना मदत करण्याची संधी दिल्याबद्दल शाळेचे आभार मानले. ही आयटी लॅब शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची भावना निर्माण करेल.तसेच विद्यार्थ्यांचे ज्ञान आणि संगणक साक्षरता वाढवण्यास मोठा हातभार लावेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा योग्यरीत्या वापर करण्याचा आणि आपले प्रोग्रामिंग स्किल वाढविण्यासाठी आयटी लॅबचा वापर करण्याचा सल्ला दिला.
डॉ.मृणालिनी गरवारे यांनी सीएमडीए समितीचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.शिल्पा भागवत यांनी केले तर आभार प्रदर्शन रामचंद्र माने यांनी केले
कॉम्प्युटर्स अँड मीडिया डीलर्स असोसिएशन (सीएमडीए), पुणे ची स्थापना 1992 मध्ये एक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून करण्यात आली होती. सदस्यांमधील संबंध दृढ करणे , सदस्यांना त्यांच्या संकटाच्या वेळी मदत करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गरजू संस्थांना आयटी उपकरणे देऊन समाजाला मदत आणि मार्गदर्शन प्रदान करण्याबरोबरच आयटी उद्योगातील नवीन ट्रेंडबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी कार्य करणे हा याचा मुख्य उद्देश्य आहे.