Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्राथमिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी प्रस्ताव मागणीबाबत कार्यवाही सुरू

प्राथमिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी प्रस्ताव मागणीबाबत कार्यवाही सुरू

 

 

पुणे, दि. १६ : राज्य शासनाने नागपूर, काटोल व कळमेश्वर जि. नागपूर, मोर्शी जि. अमरावती व संग्रामपूर जि. बुलढाणा येथे आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारणे या योजनेस मान्यता दिली असून २० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबाजवणीकरीता महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांची नियुक्ती करण्यात आली असून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

पणन मंडळाने पहिल्या टप्प्यात प्राथमिक प्रक्रिया प्रकल्पाकरीता लाभार्थी निवडीची प्रक्रिया १२ जुलै २०२४ पासून सुरू केली आहे. योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सहकारी प्रक्रिया संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, खाजगी उद्योजक आणि बाजार समिती यांचा समावेश आहे.

 

प्राथमिक प्रक्रिया प्रकल्पात पॅक हाऊस, संत्रा ग्रेडींग लाईन, प्रीकुलिंग, कोल्ड स्टोअरेज आदी सुविधांचा समावेश असून अंदाजित खर्च ४ कोटी रुपये अपेक्षीत आहे. या योजनेंतर्गत प्रकल्पाकरीता प्रथमत: लाभार्थ्यांनी १५ टक्के स्वनिधी व उर्वरित ८५ टक्के निधी बँकेकडून कर्ज स्वरुपात उपलब्ध करुन प्रकल्प उभारणी पूर्ण करणे आवश्यक आहे.

 

प्रकल्प पूर्णत्वाचा दाखला प्राप्त झाल्यानंतर शासनाकडून प्रकल्पाच्या अंदाजित किंमतीच्या ५० टक्के मर्यादेपर्यंत किंवा कमाल २ कोटी रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार असून हे अनुदान लाभार्थ्याच्या कर्ज खात्यावर जमा करण्यात येईल. या प्रकल्पाकरीता प्रस्ताव मागविण्याकरीताची निविदा तसेच मॉडेल प्रकल्प अहवाल महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या https://www.msamb.com या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १ सप्टेंबर २०२४ आहे.

 

या योजनेचा लाभ संबंधित तालुक्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घ्यावा व या योजनेच्या अधिक माहितीकरीता महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या प्रकल्प विभागाशी ०२०- २५५२८१०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments