जेव्हा अनन्या यांना पहिल्यांदा सततच्या पाठदुखीचा त्रास व्हायला लागला, तेव्हा आता वय झालं म्हणून त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर केलेल्या एका नेहमीच्या तपासणीने मात्र त्यांचं सारं जग उलटंपालटं झालं – त्यांना मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं. ‘चौथी स्टेज’ हे शब्द कानांवर पडताक्षणी त्यांच्या मनामध्ये भीती आणि आशंकांचा एकच कल्लोळ उठला. आणि त्यांची सगळ्यात मोठी चिंता होती, आपल्या घरच्यांना आणि मित्रमंडळींनी ही गोष्ट कशी सांगायची?
मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सरच्या निदानाची बातमी कळणे प्रचंड दु:खदायक ठरू शकते. या प्रकारचा कॅन्सर स्तनांमध्ये सुरू होतो आणि त्यानंतर हाडे, यकृत, फुफ्फुसे किंवा मेंदूसारख्या शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतो. जर्नल ऑफ ऑन्कोलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या २०२३ सालच्या एका अभ्यासानुसार मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सरच्या एकूण रुग्णांपैकी सुमारे ६ टक्के रुग्ण हे प्रारंभिक निदानाच्या वेळीच आजाराच्या चौथ्या टप्प्यावर असतात. अशा परिस्थितीमध्ये प्राथमिक भर रुग्णाचे केवळ आयुर्मान वाढविण्याऐवजी त्या व्यक्तीच्या जगण्याचा दर्जाही कसा वाढेल, हे पाहण्यावर दिला जातो.
तपासणीच्या काही खडतर फेऱ्या आणि उपचारांविषयीचे निर्णय यांतून मार्ग काढता काढता मनामध्ये भीती आणि रागाची भावना जागी होऊ शकते, ज्याचा मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकतो. “माझ्या भविष्याच्या दृष्टीने याचा काय अर्थ होतो?”, “या निदानाचा माझ्या कुटुंबावर काय परिणाम होईल?”, “मला पुन्हा कधी कामावर रुजू होता येईल का?” आणि “माझ्यासमोर उपचारांचे कोणकोणते पर्याय आहेत?” यांसारख्या प्रश्नांशी तुमचे मन झगडू लागते. या सर्व गोंधळामध्ये आपल्या निदानाविषयी कुटुंबाशी बोलणे हे एक डोंगराएवढे आव्हान वाटू लागते. पण ही एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे हे समजून घ्या. या विषयावर बोलायची मनाची तयारी झाली की तुमच्या बातमीला मिळू शकणाऱ्या भावनिक प्रतिक्रियांना सामोरे जाण्यासाठी तयार रहा. कुटुंबियांची प्रतिक्रिया धक्का बसल्याची, उद्विग्नतेची असू शकते आणि त्यातून तुमच्या मनावर असलेल्या ताणामध्ये अधिकच भर पडू शकते. अशी परिस्थिती हाताळण्यासाठी सुरुवातीला कुटुंबातील एकाच खात्रीच्या व्यक्तीला विश्वासात घेऊन ही बातमी सांगण्याचा विचार करा. म्हणजे जेव्हा तुम्ही ही बातमी इतरांना सांगत असाल तेव्हा ही व्यक्ती तुम्हाला भावनिक आधार देऊ शकेल. तुमचे कुटुंब ही माहिती पचवत असताना ते तुम्हाला भावनिक प्रोत्साहनाच्या रूपात किंवा दैनंदिन कामात मदत करून शक्य तितका आधार कसा देऊ शकतील याविषयी चर्चा करा. जीविताच्या शक्यता वाढविण्याचे आणि जगण्याचा दर्जा सुधारण्याचे उद्दीष्ट असणाऱ्या प्रगत उपचारपद्धतींसह उपचाराचे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत याविषयी त्यांच्याशी चर्चा करणेही महत्त्वाचे आहे.
इथे माहिती ही तुमची ताकद आहे आणि तुमच्याजवळ जितकी जास्त माहिती असेल तितकेच तुम्ही समजून घेण्यासाठी आणि समजावून सांगण्यासाठी अधिक सुसज्ज व्हाल. विश्वासार्ह ऑनलाइन स्त्रोत, आधार गट आणि डॉक्टरांच्या माध्यमातून माहिती सहज उपलब्ध आहे. याविषयावरील नवनवी माहिती मिळवत राहिल्यानेही तुम्हाला निर्णय घेताना मदत मिळू शकेल आणि तुमचा प्रवास सुकर होऊ शकेल.
पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटल येथील ऑन्कोलॉजी विभागाच्या डिरेक्टर डॉ. शोना नाग, एमडी म्हणाल्या, “माझ्याकडील 15% रुग्णांचा कॅन्सर शरीराच्या इतर भागांत पसरल्याचे निदान होते. ही बातमी एका विश्वासू प्रियजनाजवळ उघड करण्याच्या महत्त्वावर मला भर द्यायचा आहे. यामध्ये एका काळजीवाहू व्यक्तीला सहभागीकरून घेणे प्रत्यक्ष मदतीसाठीच नव्हे तर भावनिक स्वास्थ्य जपण्याच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे ठरते. अशी काळजीवाहू व्यक्ती, विशेषत: उपचारांच्या गुंतागुंतीच्या पर्यायांचा त्यातून मिळणाऱ्या संभाव्य परिणामांचा विचार करताना उपचारांच्या नियोजनामध्ये सक्रियपणे आपले योगदान देऊ शकते आणि अनमोल अशी सोबत करू शकते.”
हा अवघड संवाद साधताना पुढील सहा महत्वाचे मुद्दे तुमचे मार्गदर्शन करू शकतील:
1. आपले निदान आणि उपचारांचे पर्याय काय आहे हे समजून घ्या: मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर, त्यावरील उपचारांचे प्रगत पर्याय आणि संभाव्य दुष्परिणाम या सर्व बाबी नीट समजून घ्यायला पुरेसा वेळ द्या. याविषयी माहिती करून घेतल्याने तुम्हाला वेळच्यावेळी आणि योग्य निर्णय घेणे शक्य होईल. यामुळे तुमच्या प्रियजनांनासुद्धा ही परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास व तुम्हाला कशाची गरज भासू शकेल याची कल्पना करण्यास मदत होईल.
2. आपल्या जवळच्या व्यक्तीशी संवाद साधा: आपल्या सहचराशी निदानाविषयी चर्चा करण्यासाठी एक निवांत आणि एकांतातील वेळ निवडा. तुमच्या भावना आणि उपचारांचे नियोजन, तुमच्या जगण्याचा दर्जा वाढवू शकतील आणि कालावधी लांबवू शकतील अशा प्रगत पर्यायांविषयी मोकळेपणाने बोला. त्यांनाही आपल्या भावना व्यक्त करण्यास प्रोत्साहन द्या. या संवादामुळे तुमचे नाते अधिक भक्कम बनेल आणि पुढील वाटचालीचे चित्र दोघांच्याही मनात सुस्पष्ट होईल.
3. मुलांना तुमचे निदान सोप्या भाषेत समजावून सांगा: मुलांचे वय आणि त्यांची समज यानुसार आपले संभाषण असू द्या. मुलं खूप लहान असतील तर साधीसोपी आणि दिलासा देणारी भाषा वापरा. किशोरवयीन मुलांना अधिक तपशीलवार माहिती देता येईल. यात कमीत-कमी दुष्परिणाम असलेले प्रगत उपचार घेण्याच्या शक्यतेचाही समावेश करा. त्यांना प्रश्न विचारायला प्रोत्साहित करा आणि आपल्या भावना व्यक्त करण्यात काही चूक नाही याचे आश्वासन त्यांना द्या.
4. आपल्या भावना व्यक्त करा: भीती, राग किंवा आशा अशा कोणत्याही भावना आपल्या कुटुंबाशी वाटून घ्या. त्यांनाही अशाचप्रकारच्या भावना जाणवत असण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला व्यक्त होण्याची एक सुरक्षित जागा ते पुरवू शकतात. आपल्या चिंतेचे विषय नेमके कोणते आहेत हे ओळखा म्हणजे तुम्हाला योग्य संसाधने किंवा तुम्हाला आधार देणाऱ्या योग्य व्यक्तींचा शोध घेण्यास मदत मिळू शकेल.
5. स्वत:ची काळजी घेण्यास प्राधान्य द्या: आपल्या निदानाविषयी चर्चा करणे हे भावनिकदृष्ट्या थकवून टाकणारे असू शकते. अशाप्रकारच्या अवघड संवादानंतर स्वत:ची काळजी घेण्यासाठी थोडा वेळ बाजूला काढणे महत्त्वाचे आहे. गरज भासल्यास आपल्या आजारपणाविषयी चर्चा करण्यातून थोडा विराम घ्यायला संकोच करू नका. फक्त कोणत्याही प्रसंगी तुम्हाला कोणत्या गोष्टींवर खुलेपणाने चर्चा करणे शक्य आहे हे खुलेपणाने सांगायला विसरू नका.
मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सरचा सामना करताना धैर्य, पारदर्शकता आणि एक भक्कम आधार यंत्रणा आवश्यक असते. खुलेपणाने संवाद साधल्याने आणि आपल्या कुटुंबामध्येच एक आधाराचे जाळे उभारल्याने तुम्हाला या आव्हानात्मक काळामधून वाट ताकदीने व चिकाटीने मार्ग शोधता येईल आणि एक अधिक निरोगी, दीर्घ आणि अधिक चांगले आयुष्य मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करता येतील.


