पुणे, दि. १० : महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनचा (बीएनसीए) ३०वा वर्धापन दिन विविध उपक्रमांमधून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. त्यानिमित्त बीएनसीएमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) मार्फत संस्थेतील ८६ विद्यार्थिनी आणि १५ प्राध्यापकांनी रक्तदान करून सामाजिक कृतज्ञता व्यक्त केली. जनकल्याण रक्तपेढी तर्फे ही व्यवस्था करण्यात आली असून महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेतील इतर संस्थाही यात सहभागी झाल्या होत्या.
बीएनसीएच्या तळमजल्यावर बी.आर्च.च्या अंतीम वर्षातील शोधनिबंधाच्या (आर्किटेक्चरल डिझाईन प्रोजेक्ट) पॅनल्सचे प्रदर्शन आयोजित केले. २० विद्यार्थिनींची डिझाईन्स या प्रदर्शनात समाविष्ट आहेत. हे प्रदर्शन २० ऑगस्टपर्यंत खुले आहे. बीएनसीएच्या ३० वर्षांच्या वाटचालीवर आधारित एक लघुपटही प्रदर्शित केला असून १२ विद्यार्थिनी आणि त्यांचे दोन मार्गदर्शक यांनी मिळून तयार केलेल्या ‘डिझाईन इयर बुक’चे प्रकाशन प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप आणि उपप्राचार्य डॉ. शार्वेय धोंगडे यांच्या हस्ते करण्यात आले. उर्मिला देशपांडे या माजी विद्यार्थिनीच्या बीएनसीएतील शिक्षण घेतानाची ‘अद्भूत कहानी’ या कवितेची ध्वनीफित ऐकवण्यात आली. संस्थेतील विविध विभागांसाठी काम करणाऱ्या चालू शैक्षणिक वर्षातील स्टूडंट कौन्सिलच्या विद्यार्थिनींना डॉ. कश्यप, डॉ. धोंगडे आणि संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य जयंत इनामदार यांच्या हस्ते पद व नावाचे बिल्ले (बॅजेस) प्रदान करण्यात आले.
आपल्या भाषणात डॉ. कश्यप यांनी संस्थेच्या तीन दशकांच्या यशस्वी वाटचालीमागे असलेल्या भक्कम ‘महिला शक्ती’ मुळे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सन्मान मिळवू शकलो, असे सांगितले. काळानुरूप कल्पकता व नाविन्यातून बदल करत गेल्यामुळेच लॅण्डस्केप, एनव्हायरमेंटल आणि डिजिटल आर्किटेक्चर क्षेत्रात पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू केले असून यंदा कृत्रिम बुद्धिमत्तेवर एक स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. या क्षेत्रातील अद्ययावत माहितीचा वास्तूरचनाशास्त्रासाठी कसा उपयोग होतो आहे, हेही शिकवायला सुरूवात केली आहे, असे ते म्हणाले.
वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात डॉ. धोंगडे यांनी यशातील सातत्य ठेवण्यासाठी तीस वर्षांनंतर आणखी जबाबदारी वाढली असल्याचे सांगितले. प्रा. संजय शिंदे यांनीही विचार मांडले. मुख्य कार्यक्रमास सर्व प्राध्यापक वर्ग व कर्मचारी वर्ग उपस्थित असून विद्यार्थिनी अपर्णा हिंगे, शर्वरी औटी, हेतल तलाठी यांनी सूत्रसंचालन केले, तर मौशमी टाटिया या विद्यार्थिनीने आभार मानले. यावेळी विद्यार्थिनींनी संस्थेचे ‘आश्रम गीत’ सादर केले. दीप प्रज्वलनाने हा सोहळा संपन्न
झाला.


