पुणे : मानवतेला काळीमा फासणारी घटना पश्चिम बंगालमध्ये घडली. शिकाऊ महिला डॉक्टरवर अत्याचार करत अमानुषपणे तिचा खून करण्यात आला. मात्र त्यानंतरही पश्चिम बंगाल सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेला जाग आलेली नाही. त्याचा धिक्कार करण्यासाठी पुण्यात गुरुवारी (ता. 22) दुपारी १२ वाजता विविध संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
कोलकाता येथील आर.जी.कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीची वर अत्याचार करीत खून करण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. देशभरात याबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. दोषींवर कठोर कारवाईसाठी पुण्यात आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध संघटनेच्या वतीने धिक्कार आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. आरोग्य भारती, सेवा आरोग्य, आयुर्वेद व्यासपीठ, पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान, निरामय, सेवांकुर, नाना पालकर स्मृती समिती, एन एम ओ आदी संघटनांच्या वतीने गुरुवारी निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. दोषींवर कडक कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी निवेदन देण्यात येईल.


