*डॉ. दत्तात्रय जाधव जॉईन डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन रिजनल ऑफिस पुणे आणि सुमित कुमार डेप्युटी जनरल मॅनेजर एनएसडीसी यांची माहिती*
जगभरातील अनेक विकसित राष्ट्रांना कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहे, आणि दुसरीकडे जगातील सर्वाधिक तरुणांची लोकसंख्या असलेला देश म्हणून भारताची नवी
ओळख तयार झालेली आहे. या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधून भारत सरकारने नॅशनल स्किल
डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इंटरनॅशनल या स्वतंत्र विभागाची रचना तयार केली आहे.
हा विभाग जगभरातील विविध देशांमध्ये उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या विविध क्षेत्रातील संधींची रीतसर माहिती घेऊन या रोजगार संधी आपल्या भारतीय युवक युवतींना उपलब्ध करून देण्यासाठी देशभरात आंतरराष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करीत आहे.
यातीलच महाराष्ट्र राज्यातील एनएसडीसी इंटरनॅशनलचे पहिले आंतरराष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण केंद्र
पुणे शहरात शिवाजीनगर येथील शासकीय दूरशिक्षण तंत्रनिकेतनच्या जागेत सुरु करण्यात येत आहे.
या कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी (31 ऑगस्ट) दुपारी बारा वाजता करण्यात येणार आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रसाद लोढा, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या प्रशिक्षण केंद्रात पहिल्या टप्प्यात एनएसडीसी इंटरनॅशनल मार्फत हेल्थकेअर हॉस्पिटल ब्युटी अँड वेलनेस आणि ग्रीन जॉब स्केल सेक्टर (सोलर एनर्जी) या विभागातील प्रशिक्षण दिले जाणार आहे.
याशिवाय परकीय भाषा, संस्कृती याबाबतही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सर्वात विशेष बाब म्हणजे परदेशात नोकरी मिळवून देतो असे सांगून प्लेसमेंट एजन्सीकडून विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक आणि फसवणूक होण्याच्या गैरप्रकारांना या आंतरराष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण केंद्रांमुळे अटकाव करता येणार आहे. भारत सरकारची केंद्रीय स्तरावरील एनएसडीसी इंटरनॅशनल ही यंत्रणा यामध्ये सक्रिय असल्यामुळे सुरक्षितता, विश्वासार्हता जपली जाणार असल्याने अतिशय सोप्यापद्धतीने भारतीय तरुण तरुणींना जागतिक स्तरावरील रोजगाराच्या संधी अगदी सहजगत्या उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्यामुळे पुढे जाऊन जागतिक दर्जाची कौशल्य प्राप्त भारतीय तरुण पिढी स्वतःच्या व्यक्तिगत विकासासोबतच राष्ट्रविकासातही अधिक सक्षमपणे योगदान देण्यासाठी सज्ज होईल.
*विषय : महाराष्ट्र राज्यामध्ये कौशल्यावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि NSDC International लिमिटेड या कंपनीसोबतचा सामंजस्य करार*
● जगभरात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी देशातील युवकांना प्राप्त होण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्यमशिलता मंत्रालयाकडून प्रसिध्द करण्यांत येणाऱ्या रोजगाराच्या संधींच्या अनुषंगाने NSDC International लिमिटेड या कंपनीकडून कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम राबविण्यांत येतात.
● केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्यमशिलता मंत्रालयाकडून प्रसिध्द करण्यांत येणाऱ्या रोजगाराच्या संधी विचारात घेऊन NSDC International लिमिटेड या कंपनीने विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविण्यासाठी कौशल्यावर आधारित स्तर निहाय अभ्यासक्रम तयार केलेले आहेत. सदर कंपनीने वेगवेगळ्या देशांमध्ये मनुष्यबळाच्या कौशल्यांचा गरजेचा अभ्यास केलेला असून या कंपनीने विविध देशात लागणाऱ्या मनुष्यबळ पुरविण्याच्या अनुषंगाने भारतातील विविध राज्यात कुशल मनुष्यबळा साठी लागणाऱ्या प्रशिक्षण बाबत केंद्र स्थापन करण्याकरिता सामंजस्य करार केलेली आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा सदर कंपनीला सामंजस्य करार करावयाचा आहे.
● सदरचे अभ्यासक्रम सशुल्क असून, त्याचे स्तरनिहाय दर कंपनीने निर्धारीत केलेले आहेत. याव्यतिरिक्त कंपनीकडून विद्यार्थ्यांना परदेशातील नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यांत येणार असून, त्यासाठी प्रति विद्यार्थी रु. 10,000/- इतके शुल्क स्वतंत्रपणे आकारण्यांत येणार आहे.
● NSDC International लिमिटेड या कंपनीकडून शासकीय दूरशिक्षण तंत्र निकेतन, पुणे या संस्थेच्या परिसरात कौशल्यावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे केंद्र उभारण्यात येणार आहे. याकरिता शासकीय दूरशिक्षण तंत्र निकेतन, पुणे येथील विद्युत जोडणीसह बांधकाम क्षेत्र (वर्ग खोल्या) कंपनीस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
● महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांचेकडून विविध प्रकारचे अभ्यासक्रम राबविले जातात. त्यामुळे याअनुषंगाने त्यांच्या कामाचे स्वरुप विचारात घेता, सदरच्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने शासकीय दूरशिक्षण तंत्र निकेतन, पुणे या संस्थेच्या परिसरात NSDC International लिमिटेड या कंपनीच्या सहकार्याने उभारण्यांत येणाऱ्या प्रशिक्षण केंद्राची अंमलबजावणी व देखरेख करण्याचे काम महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांचेकडून करण्यांत येईल.
● उपरोक्त प्रमाणे आज दिनांक 30 जुलै 2024 रोजी NSDC इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीसोबत महाराष्ट्र शासनाचा सामंजस्य करार करण्यात आलेला आहे.
● सदरच्या सामंजस्य कराराचा लाभ हा राज्यातील युवकांना देशात व इतर देशांमध्ये रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी होणार आहे.


