पुणे,29 ऑगस्ट 2024 : द ऑन्कोलॉजी ग्रुप पुणे तर्फे हॉॅटेल हयात रिजन्सी येथे 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर 2024 रोजी आपल्या दुसऱ्या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही दोन दिवसीय परिषद नॅव्हिगेटिंग कॉन्ट्रोव्हर्सिज : अनरेव्हलिंग डिलेमास इन जीईजे (गॅस्ट्रोएसोफेजियल जंक्शन) अँड कोलोरेक्टल कॅन्सर या विषयावर आधारित असेल. ही माहिती पत्रकार परिषदेत रूबी हॉल क्लिनिकच्या सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागाचे संचालक व द ऑन्कोलॉजी ग्रुप पुणेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय देशमुख ,दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटरचे कन्सल्टंट ऑन्कोलॉजिस्ट व या वार्षिक परिषदेचे आयोजन अध्यक्ष डॉ.गिरीश फडके आणि रूबी हॉल क्लिनिकच्या सेंटर फॉर एआय ऑन्कोलॉजी विभागाचे संचालक व आयोजन सचिव डॉ.सुजय हेगडे यांनी दिली.
परिषदेचे आयोजन अध्यक्ष डॉ.गिरीश फडके म्हणाले की, जीईजे (गॅस्ट्रोएसोफेजियल जंक्शन – अन्ननलिका आणि पोटाला जोडणारी जागा/ठिकाण) आणि मोठ्या आतड्याच्या कर्करोगामुळे (कोलोरेक्टल कॅन्सर) निर्माण होणारी आव्हानात्मक स्थिती,त्याबाबतचे विविध मुद्दे आणि समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशानेे या दोन दिवसीय परिषदेत वैज्ञानिक सत्रे,कार्यशाळा,प्रबंध सादरीकरण व व्याख्यानांचा समावेश असणार आहे.
द ऑन्कोलॉजी ग्रुप पुणेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय देशमुख म्हणाले की, नॅव्हिगेटिंग कॉन्ट्रोव्हर्सिज : अनरेव्हलिंग डिलेमास इन जीईजे अँड कोलोरेक्टल कॅन्सर या विषयावर आधारित ही वार्षिक परिषद ऑन्कोलॉजी क्षेत्रामध्ये दैनंदिन उद्भवणारी आव्हाने दर्शविते. या परिषदेत हाऊ आय मॅनेज माय कॉम्प्लिकेशन्स यासारख्या विषयांवरील चर्चासत्रांबराबेरच अनेक माहितीपूर्ण सत्रे पार पडणार आहेत. तसेच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया प्रक्रियांबद्दल समज आणि व्यवस्थापन आणि द ड्रीम एमडीटी या सत्रात गुंतागुंतीच्या प्रक्रियांवर सखोल चर्चा करण्यात येणार आहे.
आयोजन सचिव डॉ.सुजय हेगडे म्हणाले की, या दोन्ही विषयांबाबत माहितीपूर्ण सत्रे आणि उपयुक्त अंर्तदृष्टीचा लाभ उपस्थितांना मिळेल व हा दोन दिवसीय उपक्रम विचारांचे आदान-प्रदान आणि पूर्वकल्पनांना आव्हान देणारा
ठरेल.


