पुणे २ सप्टेंबर २०२४: प्रगत तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आरोग्य सुरक्षेत परिवर्तन होणार असून काम करण्याच्या पद्धतींमध्ये बदल होतील. कृत्रिम बुद्धिमत्ता ही डॉक्टरांशी स्पर्धा करणार नाही, त्यांची जागा घेणार नाही, तर त्यांना मदत करेल. त्यामुळे डॉक्टरांनी नवीन तंत्रज्ञान स्वीकारून ते रुग्णसेवेसाठी वापरायला हवे. प्रगत तंत्रज्ञानांमुळे आरोग्य सुरक्षेतील दरी भरून काढण्यास मदत होईल, असा विश्वास जगविख्यात शल्यचिकित्सक आणि लीलावती हॉस्पिटलच्या जीआय ऑन्कॉलॉजी विभागाचे प्रमुख व हैदराबाद येथील काँटिनेंटल हॉस्पिटल्सच्या कर्करोग विभागाचे संचालक डॉ.पी. जगन्नाथ यांनी व्यक्त केला. द ऑन्कॉलॉजी ग्रुप पुणे तर्फे आयोजित दुसऱ्या वार्षिक परिषदेच्या उदघाटन सत्रात ‘प्रा.डॉ. शशांक शिंदे स्मृती व्याख्यान’ दरम्यान ते बोलत होते .
याप्रसंगी ऑन्कॉलॉजी ग्रुप पुणेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय देशमुख, परिषदेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. गिरीश फडके, आयोजन सचिव डॉ. सुजय हेगडे आणि डॉ. चेतन देशमुख, प्रख्यात शल्यचिकित्सक डॉ. जयसिंग शिंदे, डॉ. मनीष पांड्या, डॉ. शिवाजी भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.
ही दोन दिवसीय परिषद नॅव्हिगेटिंग कॉन्ट्रोव्हर्सिज : अनरेव्हलिंग डिलेमास इन जीईजे (गॅस्ट्रोएसोफेजियल जंक्शन) अँड कोलोरेक्टल कॅन्सर या विषयावर आधारित होती. कर्करोग चिकित्सा क्षेत्रामध्ये दैनंदिन उद्भवणारी आव्हाने, गुंतागुंतीचे व्यवस्थापन यासारख्या विषयांवरील चर्चासत्रांबराबेरच अनेक माहितीपूर्ण सत्रे पार पडली.
डॉ. पी. जगन्नाथ म्हणाले की, यूपीआय तंत्रज्ञानाने ज्या प्रकारे वित्तीय व्यवस्था संपूर्णपणे बदलून टाकली तसेच पुढील दोन ते तीन वर्षात आरोग्यसुरक्षा क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानामुळे बदल होतील. ते पुढे म्हणाले की वैद्यकीय चिकित्सेतील प्रगतीबरोबरच शैक्षणिक बाबींकडे देखील लक्ष द्यायला हवे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येवर चिकित्सा होत असतांना दस्तावेजीकरणामध्ये सुधारणा, चांगल्या गुणवत्तेची नियतकालिके आणि चांगले संशोधन याची गरज आहे. त्यासाठी वैद्यकीय संस्थांनी एकमेकांशी सहयोग करण्याची आवश्यकता आहे.
द ऑन्कॉलॉजी ग्रुप पुणेची अधिकृतरित्या २०१९ मध्ये स्थापना झाली आणि पहिली परिषद २०२२ मध्ये संपन्न झाली. आज द ऑन्कोलॉजी ग्रुप पुणे मध्ये पुणे शहरातील २०० कर्करोगतज्ज्ञांचा समावेश
आहे.


