पुणे : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची पुण्यात प्रतिभाताई पाटील यांच्या निवासस्थानी नुकतीच भेट झाली. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती व विद्यमान महिला राष्ट्रपती यांची ही अनोखी भेट होती. बाललैंगिक अत्याचार व महिला सक्षमीकरण याविषयी त्यांनी चर्चा केली.
यावेळी कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट व श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे दोन्ही संस्थानचे विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा सन्मान केला.यावेळी प्रतिभाताई पाटील यांचे सुपुत्र माजी आमदार रावसाहेब शेखावत, कन्या ज्योती राठोड उपस्थित होते.
अॅड. प्रताप परदेशी म्हणाले, पुण्यात होणा-या नवरात्र उत्सवाकरिता श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे राष्ट्रपतींना निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी परंपरा लाभलेल्या मंदिरात देखील दर्शनासाठी यावे, हे निमंत्रण दिले आहे. यावेळी आजी व माजी राष्ट्रपतींनी महिलांवरील वाढते अत्याचार व महिला सक्षमीकरणाविषयी चर्चा केली.