पुणे,२८ सप्टेंबर २०२४ : महाराष्ट्रातील पहिले कौशल्य विद्यापीठ असलेल्या सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एसएसपीयु) च्या किवळे कॅम्पस येथे ५ वा पदवीदान समारंभ पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे व एआयसीटीईचे अध्यक्ष टीजी सिथाराम, विशेष अतिथी व फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ.अभय फिरोदिया, सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. एस.बी मुजुमदार, प्र – कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार आदी मान्यवर उपस्थित होते .
सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र – कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार यांनी कौशल्य विद्यापीठाच्या स्थापनेमागील उद्देश आणि उद्योगासाठी कुशल रोजगारक्षम तरुण तयार करण्याचे ध्येय स्पष्ट केले.अभियांत्रिकी, व्यवस्थापन, डेटा सायन्स, ब्युटी वेलनेस, आर्किटेक्चर, न्यूट्रिशन आणि इतर क्षेत्रातील एकूण ९८४ विद्यार्थ्यांना पदवी व डिप्लोमा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले अशी माहिती त्यांनी दिली. त्या पुढे म्हणाल्या की, विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट नोकऱ्या मिळाल्या असून युजी पातळीवर ३२ लाख इतके सर्वाधिक पॅकेज मिळाले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठात कौशल्य आत्मसात करून स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे.या अग्रगण्य स्किल्स युनिव्हर्सिटीचे राष्ट्रीय पातळीवर देखील कौतुक झाले असून नुकतेच शिक्षण मंत्रालयाकडून प्रसिद्ध होणाऱ्या एनआयआरएफ रँकिंग मध्ये कौशल्य विद्यापीठ प्रकारात पहिले स्थान मिळाले. उद्योगांच्या गरजेनुसार युवकांना प्रशिक्षित करून रोजगार कार्यक्षम बनविण्यावर त्यांनी भर दिला.
सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ.एस.बी मुजुमदार यांनी कौशल्य आधारित शिक्षण हे भारताच्या शिक्षणाचे भविष्य आहे यावर भर दिला. ते म्हणाले की, कौशल्य अभावी रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. आपल्या तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी,पुणे आणि सिंबायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस इंदोर ही दोन कौशल्य विद्यापीठे सुरु करायचे ठरविले.
एआयसीटीईचे अध्यक्ष टीजी सिथाराम यांनी सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी ने युवकांमध्ये कौशल्य आधारित शिक्षण देण्याबाबत घेतलेल्या प्रयत्नाचे कौतुक केले. रोजगारक्षम होण्यासाठी तांत्रिक शिक्षणाबरोबरच उद्योगांच्या गरजांप्रमाणे ज्ञान आणि कौशल्य आवश्यक आहे,यावर त्यांनी भर दिला. कौशल्य विद्यापीठ हे स्कील इंडिया मिशन मध्ये योगदान देत असून राष्ट्रीय शिक्षण धोरणांशी सुसंगत आहे,असे त्यांनी सांगितले.
फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ.अभय फिरोदिया यांनी जागतिक पातळीवर उद्योगांमध्ये कुशल मनुष्यबळाच्या वाढत्या गरजांचे महत्व सांगितले. ते म्हणाले की, सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी हे पदवीबरोबरच विद्यार्थ्यांना ज्ञान आणि कौशल्य प्रदान करत आहे,ज्यामुळे कुशल व्यावसायिकांना समाजात सन्मान मिळत आहे. ते म्हणाले कि, आपल्या देशाला अशा अनेक कौशल्य विद्यापीठांची गरज आहे.अद्ययावत कॅम्पस आणि झपाट्याने वाढत असलेल्या उद्योग क्षेत्रांसाठी प्रॅक्टिकल ट्रेनिंग प्रदान करण्याकरिता आधुनिक लॅब्स ने सुसज्ज असलेल्या या विद्यापीठाचे त्यांनी कौतुक केले.
गुणवंत विद्यार्थ्यांना चान्सलर्स गोल्ड मेडल ने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे आत्मनिर्भर आणि कुशल पुरस्कार. आत्मनिर्भर पुरस्कार हा विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता आणि अभिनवतेला प्रोत्साहित करण्यासाठी सुरु करण्यात आला असून विद्यापीठात कौशल्य शिक्षण घेतल्यावर स्वतःचा व्यवसाय सुरु करून यशस्वीरीत्या चालविणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जातो, यंदा हा पुरस्कार लेदर उत्पादनांचा व्यवसाय सुरु करणाऱ्या व बीबीए डिजिटल मीडिया मार्केटिंगचा विद्यार्थी असलेल्या मिहीर पिंगळे याला देण्यात आला. कुशल पुरस्कार हा विद्यापीठातून कौशल्ये प्राप्त करून यशस्वीपणे करिअर सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जातो. डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशनची विद्यार्थिनी प्रणाली निंबाळकर हिला कुशल पुरस्कार देण्यात आला. डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशनला प्रीमियम ट्रान्समिशन प्रायव्हेट लि.द्वारा त्यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत समर्थन मिळाले आहे.
कुलगुरू राजेश इंगळे यांनी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला आणि मागील वर्षातील विद्यापीठाच्या कामगिरीचा आढावा घेतला.
५व्या पदवीदान समारंभात आर्किटेक्चर तसेच मेकॅट्रॉनिक्स , ऑटोमोबाईल, कसन्स्ट्रक्शन, स्मार्ट अँड सस्टेनेबल एनर्जी , सीएसआयटी, एआय अँड एमएल यातील अभियांत्रिकी पदवी, डेटा सायन्स, न्यूट्रिशनल सायन्सेस अँड डायटेटिक्स,ब्युटी अँड वेलनेस या शाखांमधील पदवी आणि फिनटेक, लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन, रिटेल अँड ई-कॉमर्स, डिजिटल मीडिया मार्केटिंग या व्यवस्थापन शाखेतील पदवी इत्यादी पदवीपूर्व, डिप्लोमा आणि पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ९८४ विद्यार्थ्यांचे यश साजरे करण्यात आले. अशा स्पर्धात्मक वातावरणात विद्यार्थ्यांचा विकास होण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञानाने विद्यार्थ्यांना सुसज्ज करण्याच्या विद्यापीठाची कटिबद्धता प्रतिबिं
बित होते.


