*
पुणे,दि. २५ : निवडणूक कामकाज जितके महत्वाचे तितकेच संवेदनशील असते, त्यामुळे या कामकाजासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या सूचना आणि नियमांचे तंतोतंत पालन करून सोपवलेली जबाबदारी समन्वयाने पार पाडावी, असे प्रतिपादन आंबेगाव निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी केले.
२० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावरील नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व क्षेत्रीय अधिकारी यांची आढावा बैठक पार पडली, त्यावेळी मार्दर्शन करताना ते बोलत होते.
आंबेगाव तहसील कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात संपन्न झालेल्या या बैठकीमध्ये नायब तहसीलदार सचिन मुंढे, निवडणूक नायब तहसीलदार डॉ सचिन वाघ, नोडल अधिकारी डॉ. डी .आर. पानगव्हाणे तसेच निवडणूक कामकाजासाठी नियुक्त सर्व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
मतदान केंद्रावरील नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी येत्या २६ आणि २७ ऑक्टोबर २०२४ रोजी शासकीय तंत्रनिकेतन अवसरी खुर्द येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी केलेल्या तयारीचा आढावा श्री. शिंदे यांनी घेतला. तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी आवश्यक तयारीच्या दृष्टीने नियोजनाबद्दल त्यांनी सूचना दिल्या.
प्रशिक्षण दोन सत्रात पार पडणार असून सकाळ सत्रामध्ये सर्व मतदान अधिकाऱ्यांना निवडणूक कामकाजाविषयी माहिती देण्यात येईल. तर दुपार सत्रामध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपटची प्रत्यक्ष हाताळणी कार्यशाळा घेण्यात येईल. यासाठी क्षेत्रीय अधिकारी, तलाठी आणि मास्टर ट्रेनर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.
0000


