पुणे : आपल्याकडील एखादी वस्तू काही काळासाठी दुस-याला द्यायची, तरी देखील आपण चार वेळा विचार करतो. मात्र, देशरक्षणार्थ आपल्या पोटच्या मुलांना एका क्षणाचाही विचार न करता अर्पण करणा-या वीरमातांचे कार्य अलौकिक आहे. अशाच देश रक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या लष्करी अधिका-यांच्या पाच वीरमातांचा सन्मान सैनिक मित्र परिवार व सहयोगी संस्थांतर्फे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. भारत माता की जय… च्या जयघोषात व सनई- चौघडयाच्या निनादात हा सन्मान सोहळा पार पडला.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात सैनिक मित्र परिवार तर्फे आयोजित सन्मान वीरमातांचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र खरे, संपदा सहकारी बँकेचे अध्यक्ष अश्विनीकुमार उपाध्ये, कर्नल ॠषिकेश चिथडे, भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, सैनिक मित्र परिवारचे आनंद सराफ, विष्णू ठाकूर, गिरीश सरदेशपांडे, पराग ठाकूर आदी उपस्थित होते.
रांगोळी आणि फुलांच्या पायघडयांनी केलेले स्वागत, सुवासिनींनी केलेले औक्षण अशा देशभक्तीने भारलेल्या वातावरणात वीरमाता ॠता देसाई, वृंदा पाथरकर, सुमेधा चिथडे, उर्मिला मिजार, अनुराधा गोरे यांचा सन्मान करण्यात आला. पुण्यातील अनेक गणेशोत्सव मंडळे आणि संस्थांनी या उपक्रमात सहभाग घेतला. गिरीश पोटफोडे, संगीता ठकार, कल्याणी सराफ, दीपक काळे, संकल्प कोंडेकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला.
रवींद्र खरे म्हणाले, देश रक्षणार्थ सिमेवर जरी सैनिक सज्ज असले, तरी देखील आपणही शस्त्र चालविणारे मन आणि मनगट निर्माण करणे गरजेचे आहे. मनगटात आणि मनात ताकद असायला हवी. आपली भूमी ही क्रांतिकारकांची भूमी आहे. त्यामुळे देव, देश आणि धर्माचा प्रचंड अभिमान बाळगून आपण रहायला हवे.
अश्विनीकुमार उपाध्ये म्हणाले, आपल्या मुलांना सिमेवर पाठविणे, हे उच्च कर्तव्य भावनेचे प्रतिक आहे. आपण सामान्य नागरिक हे बलिदान करु शकत नाही. त्यामुळे अशा वीरमातांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे, असेही त्यांनी सांगितले. वीरमातांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. अनुराधा गोरे यांनी मनोगत व्यक्त केले. आनंद सराफ यांनी प्रास्ताविक केले. गिरीश पोटफोडे यांनी सूत्रसंचालन केले. पराग ठाकूर यांनी आभार मानले.