पुणे : भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स च्या वतीने ‘संगीत स्तुती’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दिनांक ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता एरंडवण्यातील कर्नाटक हायस्कूलच्या श्रीमती शकुंतला जगन्नाथ शेट्टी ऑडिटोरियम येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स चे संचालक प्रा. शारंगधर साठे यांनी दिली.
या कार्यक्रमात आसामच्या प्रसिद्ध संगीत सत्र संस्थेचा सहभाग असणार आहे. संगीत सत्र संस्थेचे संयुक्त सचिव पार्थ प्रतिम बोराह आणि अध्यक्ष स्वप्निल बरुआही यावेळी उपस्थित राहणार आहेत. संगीत सत्र संस्थेच्या वतीने पुण्यातील ज्येष्ठ कलाकार गुरु डॉ. सुचेता चापेकर आणि पं. मनीषा साठे, पं. शमा भाटे, स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्रा. शारंगधर साठे आणि नृत्य विभागप्रमुख डॉ. देविका बोरठाकुर यांना कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे.
सन १९६८ मध्ये संगीत सत्र ही संस्था स्थापन झाली असून सत्रिय नृत्याची भारतातील सर्वात पहिली आणि जुनी संस्था आहे. यंदा संस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, त्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त आणि संगीत सत्राचे सचिव गुरु रंजनमोनी सैकिया यांनी दिली.
या सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रमात प्रसिद्ध कथक कलाकार शर्वरी जमेनिस आणि भरतनाट्यम कलाकार अरुंधती पटवर्धन सादरीकरण करणार आहेत. आसाममधून संगीत नाटक अकादमीचे उस्ताद, बिस्मिल्लाह खान पुरस्कारप्राप्त कलाकार नरेन चंद्र बरुआ, डॉ. मीरनंदा बोरठाकुर आणि प्रसिद्ध खोल कलाकार अरुणाभ मलकर यांसह अनेक सत्रिय कलाकार सादरीकरण करतील. भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संगीत व नृत्याचे विद्यार्थी ‘गीत रामायण’ सत्रिय या शैलीत सादर करणार आहेत.
सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रमांमुळे विविध संस्कृती एकत्र येतात व त्यांच्यात बंध निर्माण होतो. असामी समुदाय संघटना ‘आसामी’ या कार्यक्रमाचे संयोजन करत आहे, अशी माहिती अध्यक्ष राजीब बोरकोटोकि यांनी दिली आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे.