पिंपरी- १० नोव्हेंबर २०२४- पिंपरी विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेसाठी मतदान यंत्रे जुळणी करण्याच्या (पेअरिंग) प्रक्रियेला आज सकाळी सुरुवात झाली. नेताजी सुभाष चंद्र बोस, बॅडमिंटन हॉल,निगडी प्राधिकरण येथील तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रुमचे सील पोलीस बंदोबस्तात उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात आले.
या प्रक्रियेदरम्यान पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव , सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख, मतदान यंत्र कक्षाचे नोडल अधिकारी प्रशांत शिंपी यांच्यासह स्ट्रॉंग रूम समन्वय अधिकारी अभिजित केंद्रेकर नेताजी सुभाष चंद्र बोस, बॅडमिंटन हॉल, निगडी प्राधिकरण येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रूमची पाहणी केली तसेच या ठिकाणी असलेल्या सुरक्षेचा आढावा घेऊन पुढील कामकाजाचे निर्देश दिले यावेळी उमदेवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कमिशनिंग आणि पेअरिंग बाबत करावयाच्या कार्यवाहीची माहिती देणेत आली.
११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत मतदान यंत्रांच्या जुळणीची (पेअरिंगची) प्रक्रिया सुरू राहणार आहे. तसेच मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने आवश्यक सर्व प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी निवडणूक विभागाच्या प्रत्येक टप्प्यावर नियोजनबद्ध कामकाज सुरु असून उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींना या प्रक्रियेदरम्यान उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी दिली आहे. तसेच दि. १३ नोव्हेंबर व १४ नोव्हेंबर या दिवशी मतदानासाठी मतदानयंत्रे तयार करणेत येणार असल्याचे सांगितले. यावेळी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित राहणेबाबत कळविणेत आले असल्याचे सांगितले आहे.
तसेच १२ नोव्हेंबर रोजी मतदान अधिकारी / कर्मचारी यांचेकरिता दुसरे प्रशिक्षण आकुर्डी येथील कै. वसंतदादा पाटील विद्यालय, फकीरभाई पानसरे विद्यालय, मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू विद्यालय या ठिकाणी सकाळ व दुपार अशा दोन सत्रामध्ये आयोजित करणेत आले आहे.


