*
पुणे, दि. १३ : भारत निवडणूक आयोगाकडील निवडणूक खर्च सनियंत्रण संदर्भातील तरतूदीनुसार चिंचवड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची द्वितीय तपासणी निवडणूक खर्च निरीक्षक प्रेम प्रकाश मीना यांच्या उपस्थितीत थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातील तिसऱ्या मजल्यावरील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात करण्यात आली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार, निवडणूक खर्च तपासणी प्रमुख अश्विनी मुसळे, सहायक खर्च निरीक्षक पवन यादव उपस्थित होते.
उमेदवारांनी केलेल्या दैनंदिन खर्चाची तपासणी तीन टप्प्यात करण्यात येणार असून त्यातील दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. उमेदवारांच्या खर्चाची तिसरी आणि शेवटची तपासणी येत्या १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराच्या प्रचार खर्चाची मर्यादा ४० लाख रूपये इतकी असून चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये एकूण २१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यांचे दररोजच्या खर्चाचे लेखे आणि खर्चाच्या पावत्या या लेखांकन पथकाकडे जमा केल्या जातात. त्याचवेळी शॅडो रजिस्टर मध्ये उमेदवाराचा रोजचा प्रचारखर्च नोंदवला जातो. त्याचप्रमाणे इतर पथकाकडून रोकड अथवा इतर जप्ती झाल्यास त्याचीही नोंद लेखा पथकाकडून घेतली जाते.
उमेदवारांच्या खर्चाची द्वितीय तपासणी निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे करण्यात आली असून निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे उमेदवारांनी सादर केलेला खर्च तपासला जात आहे. पुढील तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या तपासणीसाठी विहीत वेळेत उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी खर्चाचा तपशील सादर करावा, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी श्री. पवार यांनी दिल्या आहेत.
000


